Home Breaking News पुण्यात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; समर्थ पोलीस ठाण्याची मोठी कारवाई, तीन सराईत...

पुण्यात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; समर्थ पोलीस ठाण्याची मोठी कारवाई, तीन सराईत गुन्हेगार जेरबंद

94
0
पुणे – शहरातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी अत्यंत शिताफीने आणि कौशल्याने तीन सराईत चोरट्यांना जेरबंद केले आहे. या आरोपींनी चार लाखांहून अधिक रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी पुणे शहर पोलिसांच्या दक्षतेचा आणि कार्यक्षमतेचा उत्तम नमुना ठरली आहे.
घटना २५ जून २०२५ रोजी घडली होती. फिर्यादी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत ₹४,५७,६९८ रोख रक्कम आणि दागिने लंपास केले. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हेगारांचा माग काढला आणि खास पथकाची स्थापना करून आरोपींपर्यंत पोहोचले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
रोहीत उर्फ विनायक प्रमोद भोंडे (वय २१), येरवडा, पुणे
रोहीत उर्फ रावण नानाभाऊ लंके (वय २४), विश्रांतवाडी, पुणे
निखील परशुराम खांडेकर (वय २०), येरवडा, पुणे
यामधील रोहीत लंके हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर आधीच २९ गंभीर गुन्हे नोंद आहेत. विशेष म्हणजे, त्याच्यावर तडीपारची कारवाई देखील झाली होती, मात्र त्याने आदेशाचे उल्लंघन करून पुन्हा पुण्यात प्रवेश करत ही घरफोडी केल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून १०,००० रुपये रोख रक्कम, चोरीसाठी वापरलेले वाहन व हत्यारे जप्त केली आहेत. यामुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात मोठे यश मिळाले आहे.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त श्री. कृषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अनुजा देशमाने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे आणि अंमलदार पागार, औचरे, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.