पुणे – पुणे शहरातील कुख्यात टिपू पठाण टोळीतील एका मोका गुन्ह्यातील फरारी आरोपीला अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ०५ च्या पथकाने हैद्राबादमधून अटक केली आहे. आरोपी फैयाज गफार बागवान (वय २८) याच्या अटकेमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.
फैयाज बागवान याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०८(२), ३२९(३), ३५१(२), ३५२, १८९(१)(२), १९१(२) सह कलम ६१(२), १११ तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत ३(१), ३(२), ३(४) अशी गंभीर प्रकरणं नोंद आहेत. तो हडपसर येथील रहिवासी असून, गेल्या काही महिन्यांपासून फरार होता.
गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार नासेर देशमुख आणि राहुल ढमढेरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी हैद्राबादमधील प्रेमनगर, हाफीसपेठ येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पुणे पोलिसांचे पथक तात्काळ तेलंगणामध्ये रवाना झाले.
मियापुर पोलीस स्टेशनच्या सहकार्याने आरोपीस अटक करून कायदेशीर प्रक्रिया राबवत पुण्यात आणण्यात आले. या कारवाईमुळे पुणे गुन्हे शाखेच्या कार्यक्षमता आणि सतर्कतेचे कौतुक होत आहे.
ही विशेष कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खरात आणि त्यांचे पथक – पोलीस अंमलदार नासेर देशमुख, शहाजी काळे, राहुल ढमढेरे यांनी केली.
या अटकेमुळे टिपू पठाण टोळीतील गुन्हेगारी कारवायांना मोठा झटका बसला आहे. पोलीस प्रशासनाचे हे कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे.