पुणे – धनकवडी भागात नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना सहकारनगर पोलिसांनी अचूक गुप्त माहितीच्या आधारे जेरबंद केले आहे. या प्रकरणी गुन्हा उघडकीस येऊन आरोपींकडून ३०,००० रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
दि. २३ जुलै २०२५ रोजी चिंतामणी गणेश मंदिराजवळील केशव कॉम्प्लेक्सजवळ काही अज्ञात इसमांनी मारुती सियाज कारसह इतर पार्क केलेल्या गाड्यांच्या काचा फोडून, “आम्ही धनकवडीचे भाई आहोत” असे मोठ्याने ओरडून परिसरात दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ३००/२०२५ नुसार भा.दं.वि. व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अंतर्गत गंभीर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सागर पाटील आणि त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. पोलीस अंमलदार अमोल पवार यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार नवले ब्रिज येथे आरोपी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
तपासादरम्यान हे कृत्य रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित कैलास आढाव (वय २१) आणि त्याचा साथीदार सुधीर बाप्पू सावंत (वय १९) यांच्यासह तीन अल्पवयीन साथीदारांनी केले असल्याचे निष्पन्न झाले. सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
सहकारनगर पोलिसांची ही कारवाई अतिशय प्रशंसनीय असून शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.
मुख्य ठळक मुद्दे:
सार्वजनिक रस्त्यावर वाहनांची तोडफोड करत दहशत पसरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त
रोहित आढाव व सुधीर सावंतसह तिघे अल्पवयीन गुन्हेगार ताब्यात





