पुणे शहर पोलिसांची धडक कारवाई; “व्हिक्टोरिया थाई स्पा” मध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश!
पुणे शहरातील गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष व युनिट-४च्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत विमानतळ परिसरातील “व्हिक्टोरिया थाई स्पा” मध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार परदेशी आणि एक भारतीय महिला अशा पाच पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.
स्पा सेंटरच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय राबवला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. त्यानंतर छापा टाकून संबंधित ठिकाणावरून दोन मॅनेजर आणि एक चालक-मालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
सदर प्रकरणी बीएनएस कलम १४३(३)(५) व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ व ७ अंतर्गत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख आणि उप-आयुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सपोफो अजय राणे, व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
सदर कारवाईमुळे पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विश्वास बसतो. महिला सुरक्षा आणि अनैतिक व्यापाराविरोधातील ही कठोर पावले समाजाच्या हितासाठी अत्यंत आवश्यक आहेत.