Home Breaking News वाघोली पोलिसांची कारवाई – दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ४.३३ लाखांचा मुद्देमाल...

वाघोली पोलिसांची कारवाई – दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ४.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त!

30
0
पुणे | २२ जुलै २०२५ – पुणे शहरातील वाघोली व हडपसर परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी करून नागरिकांचे दागदागिने लांबवणाऱ्या सराईत आरोपींच्या टोळीचा वाघोली पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली असून ४ लाख ३३ हजार २२६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून अचूक कारवाई
मा. वरिष्ठांच्या सूचनांनुसार सुरू असलेल्या गुन्हा क्रमांक २२४/२०२५ च्या तपासात पोलीस अंमलदार समीर भोरडे व पांडुरंग माने यांनी गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे मुख्य आरोपी सचिन भिमराव पाटील (वय ३५) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी व ३७ ग्रॅम सोन्याचे दागिने मिळून आले. पुढील चौकशीत त्याने गुन्ह्यात सहभागी असलेला आपला साथीदार राजू मल्लाप्पा नायकवडे (वय २९) याचे नाव उघड केले.
 चोरीचे दागिने वितळवून विक्री
या टोळीने वाघोली आणि हडपसर परिसरात अनेक ठिकाणी दिवसा घरफोडी करून सोनं-चांदीचे दागिने चोरले. आरोपी राजू नायकवडे याने चोरीचे दागिने श्रीवंत उत्तमराव काटकर (वय ३५) या आटवणीवाल्या सोनाराला विकले. काटकरने हे दागिने वितळवून ७४० ग्रॅम चांदीची लगड तयार केली, ती पोलिसांनी जप्त केली. तसेच सोन्याची लगड घनशाम रामरतन वर्मा (वय ४८) या सराफाकडे विकण्यात आली होती.
पोलिसांची उत्कृष्ट समन्वय व तपास कौशल्य
या तपासात एकूण ९ घरफोडी गुन्हे उघडकीस आले आहेत, ज्यामुळे पोलीस दलाचे तपास कौशल्य अधोरेखित झाले आहे. तपासात आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल खालीलप्रमाणे आहे –
▪️ ३७ ग्रॅम सोनं
▪️ ७४० ग्रॅम चांदी
▪️ एक दुचाकी व रोख रक्कम
▪️ एकूण किंमत: ₹४,३३,२२६
 वरिष्ठांचे मार्गदर्शन, पोलिसांचे तत्पर योगदान
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शन आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांच्या सूचनांनुसार पार पडली.
कारवाईत पु.उ.नि. मनोज बागल, सपोफौ रमेश साबळे, समीर भोरडे, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, मंगेश जाधव, राजाराम अस्वले, शिवाजी सालके, शिवाजी चव्हाण, प्रितम वाघ यांचा मोलाचा सहभाग होता.
 पोलिसांकडून नागरिकांना आवाहन:
घर बंद करताना दरवाजे-खिडक्या नीट बंद केल्यात, शेजाऱ्यांना कल्पना दिल्यास आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसवल्यास अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करता येईल, असा संदेश पोलिसांनी दिला आहे.