Home Breaking News पवना धरणात साठवण क्षमतेचा 78.87% पाणीसाठा; विसर्ग थांबवला, पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

पवना धरणात साठवण क्षमतेचा 78.87% पाणीसाठा; विसर्ग थांबवला, पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

मावळ तालुका | २३ जुलै २०२५ – मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागात स्थित पवना धरणात आज सकाळी ६ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार ७८.८७ टक्के पाणीसाठा झालेला आहे. मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात भरपूर जलसाठा झाला असून, पावसाचा जोर ओसरल्यामुळे धरणातून सुरू असलेला विसर्ग सध्या बंद करण्यात आला आहे.
धरण विभागाचे अधिकारी रजनीश बारिया यांनी ‘दैनिक मावळ’ शी बोलताना सांगितले की, मागील २४ तासांत पवना धरण क्षेत्रात २९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत एकूण १४५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत पवना धरण लवकर भरत आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात केवळ ४९.३०% जलसाठा होता.
 बॅकवॉटरमध्येही सुरू आहे पावसाची रिमझिम
पवना धरणाच्या बॅकवॉटर भागात हलक्या स्वरूपात पावसाची नोंद सुरूच आहे. त्यामुळे धरणात पाण्याचा नैसर्गिक येवा सुरू असून, पावसाचा वेग थोडा कमी झाला असला तरी हवामान खात्याच्या अंदाजानुसार लवकरच पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो.
 शेतीसाठी दिलासा – धरण लवकर भरल्याने कृषी पाणीटंचाईवर उपाय
पवन मावळ हा जास्त पर्जन्यमान असलेला क्षेत्र असून, येथे मुख्यतः पावसाळी पाण्यावर आधारित शेती होते. त्यामुळे पावसाचा सुरळीत पुरवठा आणि धरणाचा भराव या भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्याची स्थिती पाहता, धरण १०० टक्के भरल्यास आगामी हंगामासाठी पाण्याची चिंता दूर होण्याची शक्यता आहे.
 धरण विभाग सज्ज, नागरिकांनी सहकार्य करावे – प्रशासनाचे आवाहन
पावसाची अनिश्चितता लक्षात घेता, धरण विभाग सतर्क असून कोणतीही संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेत आहे. प्रशासनाने नागरिकांना धरण परिसरात गैरवर्तन किंवा बिनधास्त फिरणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
 पवना धरण स्थिती (२३ जुलै २०२५ रोजी):
▪️ एकूण पावसाची नोंद: १४५९ मिमी
▪️ मागील २४ तासातील पाऊस: २९ मिमी
▪️ पाणीसाठा: ७८.८७%
▪️ विसर्ग स्थिती: बंद
▪️ गतवर्षीच्या तुलनेत जलसाठा: ३०% ने अधिक