पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका २२ वर्षीय IT महिला कर्मचाऱ्याने खोट्या बलात्काराच्या तक्रारीमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असताना, पोलिसांनी महिलेकडून दिलेली माहिती पूर्णतः खोटी व दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट केले आहे.
या महिलेने ३ जुलै रोजी तक्रार दिली होती की, एक ‘डिलिव्हरी एजंट’ तिच्या फ्लॅटमध्ये घुसला, काही रसायन फवारून तिला बेशुद्ध केले आणि तिच्यावर अत्याचार केला. तसेच, संबंधित व्यक्तीने तिच्या मोबाईलवरून सेल्फी काढून, तो प्रसारित करण्याची धमकी दिल्याचेही तिने पोलिसांना सांगितले होते.
पण तपासादरम्यान या कथेमध्ये अनेक विसंगती आढळल्या. पोलीस उपायुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील तपासात निष्पन्न झाले की, तक्रारदार महिला आणि आरोपी तरुण हे पूर्वीपासूनच एकमेकांचे मित्र होते आणि त्याच्या फ्लॅटमध्ये येण्यास महिला तयार होती. जबरदस्तीचा कोणताही प्रकार झाला नसल्याचे स्पष्ट झाले.
तसेच, कोणतेही जबरदस्तीने प्रवेशाचे चिन्ह सापडले नाही आणि रसायन फवारण्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही. परिणामी, या प्रकरणात महिलेने खोटा खटला दाखल करून पोलीस तपासात अडथळा निर्माण केल्याचे स्पष्ट झाले.
यामुळे तिच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम २१२, २१७ आणि २२८ अंतर्गत खोटी माहिती देणे, खोटे पुरावे सादर करणे आणि अधिकाऱ्यांना दिशाभूल करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाने महिलांच्या खऱ्या तक्रारींचा देखील अवमान होण्याची भीती निर्माण केली आहे. त्यामुळे समाजात गैरसमज निर्माण होणार नाही, यासाठी पोलिस प्रशासनाने हे प्रकरण वेळेत उघडकीस आणले.