Home Breaking News कासारसाई धरणात पोहण्याचा मोह ठरला जीवघेणा; १९ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

कासारसाई धरणात पोहण्याचा मोह ठरला जीवघेणा; १९ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

51
0
कुजगाव | मावळ तालुका: पावसाळ्याच्या सुट्टीमध्ये पर्यटनासाठी धरण परिसरात फिरायला गेलेल्या पाच तरुणांपैकी एका १९ वर्षीय युवकाचा पोहण्यासाठी उतरल्यावर धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. २० जुलै) घडली. मृत युवकाचा मृतदेह सोमवारी (दि. २१) दुपारी शोधमोहीमीनंतर बाहेर काढण्यात आला.
कुजगाव हद्दीत असलेल्या कासारसाई धरण परिसरात पाच मित्र फिरण्यासाठी गेले होते. या वेळी, थोडी मजा करावी या उद्देशाने एक युवक धरणात पोहण्यासाठी उतरला. मात्र, अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. उपस्थित मित्रांनी आरडाओरड केली, परंतु त्याला वाचवता आलं नाही.
या घटनेनंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग मित्र संस्था यांच्या मदतीने शोधकार्य हाती घेण्यात आले. अखेर सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास या युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात धरण, तलाव, नद्या यासारख्या जलाशयांमध्ये नागरिकांची वर्दळ वाढत असते. मात्र, योग्य खबरदारी न घेतल्यास अशी दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते.
स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांनी या भागात धोकादायक ठिकाणी पोहण्यास बंदी घालावी आणि जनजागृती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा जलाशयांमध्ये बेधडकपणे पोहण्याच्या सवयीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सुट्टीचा आनंद घेण्याच्या नादात अनेकदा जीव गमवावे लागतात, हे वास्तव विसरू नये.