लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील स्वागत हॉटेलसमोर एक धक्कादायक प्रकार घडला. आज मंगळवारी (ता. २२ जुलै) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास, रस्त्यालगत लावलेल्या एका चारचाकी वाहनावर अचानक झाड कोसळले.
ही चारचाकी आळंदी म्हातोबा येथील युवा उद्योजक केतन मच्छिंद्र जवळकर यांची असल्याची माहिती मिळाली आहे. वाहन पार्क करत असतानाच अचानक गुलमोहराचे एक प्रचंड झाड त्यांच्या गाडीवर कोसळले. विशेष बाब म्हणजे, यावेळी केतन जवळकर स्वतः त्या गाडीत उपस्थित होते. मात्र झाड गाडीच्या मागच्या भागावर पडल्यामुळे ते थोडक्यात बचावले.
या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही, परंतु गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परीसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली आणि झाड हटविण्याचे काम सुरू केले. स्थानिक प्रशासनालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत केली.
या घटनेने महत्त्वाचा संदेश देतो की, सार्वजनिक रस्त्यांवरील झाडांची वेळोवेळी छाटणी आणि देखभाल न झाल्यास अशा घटना घडू शकतात. संबंधित यंत्रणांनी यापुढे अशा प्रकारच्या अपघातांना टाळण्यासाठी कार्यवाही करणे अत्यावश्यक आहे.