Home Breaking News पुण्यात मोठी कारवाई; १६ बांग्लादेशी घुसखोरांना मायदेशी पाठविण्यात पुणे पोलिसांना यश

पुण्यात मोठी कारवाई; १६ बांग्लादेशी घुसखोरांना मायदेशी पाठविण्यात पुणे पोलिसांना यश

94
0
पुणे शहरात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १६ जणांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये १५ महिला आणि १ पुरुषाचा समावेश असून, ही कारवाई मंगळवारी (दि. २२ जुलै) पार पडली.
या कारवाईसाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखा, गुन्हे शाखेच्या दोन पथकांसह पाच परिमंडळातील तपास पथकांनी समन्वयाने कार्यवाही केली. बुधवारी पेठ, शुक्रवारी पेठ आणि आंबेगाव या परिसरातून या घुसखोरांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी बहुतेकजणी वेश्याव्यवसायात गुंतल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंढवा येथील शासकीय महिला सुरक्षागृहात ठेवण्यात आले होते.
तब्बल चार वर्षांमध्ये म्हणजेच 2020 ते 2024 या कालावधीत केवळ आठ बांग्लादेशी नागरिकांना पुण्यातून डिपोर्ट करण्यात आले होते. मात्र, 2025 मध्ये आतापर्यंत १७ बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, मंगळवारीची कारवाई ही सर्वात मोठी मानली जात आहे.
या कारवाईदरम्यान पुणे विमानतळावरून १५ महिला आणि मुंबई विमानतळावरून १ पुरुष नागरिकाला कोलकात्याच्या दिशेने विमानाने रवाना करण्यात येणार आहे. पुढे सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या समन्वयाने त्यांना बांग्लादेशात परत पाठवले जाईल. यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्या असून, राज्य शासन आणि केंद्रीय गृह मंत्रालयानेही याला मंजुरी दिली आहे.
शहरातील बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांविरुद्ध अशा पद्धतीने कारवाई होत राहणार असून, पुणे पोलिसांकडून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. यामुळे शहरातील सुरक्षेला बळ मिळणार असून, नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.