राज्यात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. याचा गंभीर विचार करून राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केली की, “कोणत्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्यात जर नागरिकांनी 1930 किंवा 1945 हा हेल्पलाइन क्रमांक तातडीने डायल केला, तर फसवणूक झालेल्या पैशांचा प्रवास त्वरित रोखता येईल.”
हे सिस्टिम राष्ट्रीय पातळीवर सायबर क्राईम हेल्पलाइनशी जोडले गेले आहे आणि यामधून बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर होण्याआधीच ते फ्रीझ करण्याची सोय तयार करण्यात आली आहे. फसवणुकीनंतर काही मिनिटांत ही माहिती दिल्यास नुकसान टाळता येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यभरात यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असून, पोलिसांना यासाठी प्रशिक्षितही करण्यात येत आहे. हे पाऊल नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी एक मोलाची कामगिरी ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या पुढाकाराचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. राज्यातील नागरिकांनीही या क्रमांकांची माहिती लक्षात ठेवून सायबर गुन्ह्यांबाबत सजग राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.