जगभरात शिक्षण व उद्योगाच्या क्षेत्रात आपल्या स्वतंत्र ओळखीने नावारूपास आलेल्या पिंपरी चिंचवड विद्यापीठ व सहाय्यक संस्थांच्या वतीने एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. आगामी १६ ते १८ ऑगस्ट २०२५ दरम्यान दुबईतील हॉटेल कॉनरॉड येथे भव्य ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह (GEC) आयोजित करण्यात आले असून याचे उद्घाटन महाराष्ट्राचे औद्योगिक विकास मंत्री मा. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
या कॉन्क्लेव्हचे आयोजन पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ, गर्जे मराठी ग्लोबल, व सावा हेल्थकेअर लि. यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. उद्योग, शिक्षण, गुंतवणूक आणि जागतिक नेटवर्किंग यांचे अद्वितीय मिश्रण असलेल्या या उपक्रमामुळे महाराष्ट्र आणि आखाती देशांतील व्यावसायिक संबंध अधिक घट्ट होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
जीईसीचे वैशिष्ट्ये:
दुबई, शारजा, अबुधाबीतील फ्रिजोन्स व डीपी वर्ल्ड जाफसा सेंटर ला सहभागी उद्योजकांची भेट
उद्योजकता, तंत्रज्ञान, गुंतवणूक, भविष्यातील संधी व आव्हाने यावर चर्चासत्रं
यशस्वी उद्योजकांच्या प्रेरणादायी मुलाखती
नवउद्योजक व व्यावसायिकांना मार्गदर्शनाची सुवर्णसंधी
या परिषदेच्या यशस्वी आयोजनामध्ये सावा हेल्थ केअर लि. चे चेअरमन विनोद जाधव, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीचे डॉ. गिरीश देसाई, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे सचिन ईटकर, कॉमसेन्स टेक्नॉलॉजीचे सागर बाबर, तसेच गर्जे मराठी ग्लोबलचे आनंद गानू आदी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, उद्योजक प्रतापराव पवार, संदीप वासलेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या आंतरराष्ट्रीय उपक्रमामुळे महाराष्ट्रातील स्टार्टअप्स, MSMEs, उद्योजक व व्यावसायिकांसाठी नवीन दरवाजे खुल्या होणार आहेत.
आयोजकांचे म्हणणे:
“हे संमेलन म्हणजे उद्योग व शिक्षण क्षेत्रात भारत आणि आखात देशांमधील भक्कम भागीदारीसाठीचा सुवर्णमहोत्सव आहे. नवउद्योजकांना जागतिक व्यासपीठावर प्रस्थापित होण्यासाठी जीईसी मार्गदर्शक ठरेल,” असे डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले.