पुणे शहरातील आंबेगाव पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट-२ यांच्या संयुक्त कारवाईत अवघ्या २४ तासांत ४० लाखाच्या जबरी चोरी प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. आरोपींकडून ९ लाख ३५ हजार ५०० रुपये रोख रक्कम, थार गाडी, पाच मोबाईल हॅण्डसेट तसेच नंबर प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत.
१५ जुलै २०२५ रोजी, धाराशिव येथील स्टील व्यवसायिक पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे मालाचे पैसे घेण्यासाठी आले होते. त्यांच्याकडे ४० लाखांची रोख रक्कम असलेली बॅग होती. जेव्हा ते आंबेगावमधील बाबाजी पेट्रोल पंप परिसरात मित्रासह चालत होते, तेव्हा काळ्या रंगाच्या थार गाडीतून आलेल्या तिघांनी बॅग हिसकावून पलायन केले.
या घटनेची तात्काळ नोंद घेत आंबेगाव पोलीस स्टेशनने गु.र.नं. १५८/२०२५ नुसार गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून गाडीचा क्रमांक MH 12 WE 0085 हा निष्पन्न झाला. गुप्त बातमीदारांच्या साहाय्याने आणि तांत्रिक तपासातून गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.
१६ जुलै २०२५ रोजी, खंडोबा मंदिर रोड, भुगाव, पुणे येथून प्रदीप रामदास डोईफोडे (वय ३५), मंगेश दिलीप ढोणे (वय ३२) आणि एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली – फिर्यादीचा मित्रच आरोपींना माहिती पुरवून या गुन्ह्यात सहभागी होता.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त श्री. संजय बनसोडे, पोलीस उपआयुक्त निखील पिंगळे, परिमंडळ-२ चे मा. पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते, गुन्हे शाखा सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळेकर, तसेच स्वारगेट विभागाचे सहा. पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये गुन्हे शाखा युनिट-२ चे विजय कुंभार, अंजुम बागवान, गजानन चोरमले, तसेच आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा होता.
या कारवाईमुळे पुणे शहरात निर्माण झालेली भीती दूर झाली असून, गुन्हेगारीला लगाम बसवण्याच्या दिशेने एक प्रभावी पाऊल उचलले गेले आहे. पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे नागरिकांकडून जोरदार कौतुक होत आहे.