Home Breaking News पुण्यात धडक कारवाई! पिस्तूल व काडतुसासह सराईत गुन्हेगार जेरबंद – गुन्हे शाखा...

पुण्यात धडक कारवाई! पिस्तूल व काडतुसासह सराईत गुन्हेगार जेरबंद – गुन्हे शाखा युनिट २ चा अचूक सापळा

142
0
पुणे शहरातील गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अंमली माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत एक रेकार्डवरील सराईत गुन्हेगार जिवंत काडतुसासह पिस्तूल घेऊन फिरताना तळजाई वसाहत, सहकारनगर येथे रंगेहाथ पकडण्यात आला आहे. पोलिसांनी या आरोपीकडून ४०,४०० रुपये किंमतीचे पिस्टल व मॅगझिनसह जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच मोठा अनर्थ टळला आहे.
ही कारवाई १५ जुलै २०२५ रोजी करण्यात आली. पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व शंकर कुंभार गस्त घालत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, एक इसम पिस्तूलसह लुंकड शाळेजवळ, तळजाई वसाहत येथे थांबलेला आहे. तातडीने युनिट २ चे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार सपोनि आशिष कवठेकर व तपास पथकाने सापळा रचत इसमाला ताब्यात घेतले.
सदर आरोपीने आपले नाव ओंकार विजय मोकाशी (वय २९, रा. उत्तमनगर, पुणे) असे सांगितले. अंगझडतीत त्याच्याकडून एक सिल्व्हर रंगाचे पिस्टल, मॅगझिन आणि एक जिवंत काडतूस सापडले. या प्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे भा.ह.का. ३(२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, हा आरोपी रेकार्डवरील गुन्हेगार असून उत्तमनगर पोलीस ठाण्यात ३०७ अंतर्गत चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा धोकादायक गुन्हेगाराला शस्त्रासह पकडल्याने संभाव्य गुन्हा टळला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र मुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईसाठी पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहाय्यक निरीक्षक आशिष कवठेकर, सपोनि अमोल रसाळ, तसेच शंकर कुंभार, उज्वल मोकाशी, विजयकुमार पवार, ओमकार कुंभार आदी अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी संयुक्तरित्या सहभाग घेतला.
पोलिसांनी वेळेवर केलेल्या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास दुणावला आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे पोलिसांची ही कारवाई एक महत्वपूर्ण पाऊल ठरली आहे.