पुणे शहरातील फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत तब्बल ६ लाख ५८ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कर्नाटकातून आलेल्या एका इसमाला अटक करत याबा नावाच्या अंमली गोळ्यांचा साठा हस्तगत करण्यात आला. ही कारवाई १७ जुलै २०२५ रोजी केली गेली असून, या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थांचे जाळे उघडकीस आले आहे.
पुणे शहराचे पोलिस आयुक्त मा. श्री. अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार आणि रेड अलर्ट एरियामध्ये अंमली पदार्थांच्या विरोधात तातडीने कारवाईचे निर्देश दिल्यानंतर ही मोहिम राबवण्यात आली. प्रभारी अधिकारी प्रशांत भस्मे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले.
पोलीस अमंलदार नितीन तेलंगे व गजानन सोनुने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कर्नाटक येथील निशान हबीब मंडल (वय ४७ वर्षे) हा इसम याबा गोळ्यांच्या विक्रीसाठी कॅसेट गल्ली, फरासखाना येथे येणार होता. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली. तपासात आरोपीकडून ७१८ याबा गोळ्या (७५.३६ ग्रॅम वजन), चार मोबाईल फोन, एक दुचाकी व रोख रक्कम असा एकूण ६,५८,८६०/- रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला.
सदर आरोपीवर एन.डी.पी.एस. अॅक्ट ८(क), २२(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई अपर पोलिस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त श्री. कृषिकेश रावले, सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीमती अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईसाठी पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अजित जाधव, पो.उ.नि. अरविंद शिंदे यांच्यासह २५ हून अधिक पोलिस कर्मचारी कार्यरत होते.
ही कारवाई केवळ एक आरोपीवर मर्यादित नसून, यामागील संपूर्ण अंमली पदार्थांच्या जाळ्याचा तपास लवकरच अधिक सखोल केला जाणार आहे. पुणे पोलिसांच्या या धाडसी पावलामुळे शहरातील युवापिढीला घातक अशा अंमली पदार्थांपासून मोठा दिलासा मिळाला आहे.