Home Breaking News PMRDA क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी १५ दिवसांची अंतिम मुदत; आमदार सुनील शेळके...

PMRDA क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी १५ दिवसांची अंतिम मुदत; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश!

255
0
PMRDA क्षेत्रातील बेकायदेशीर गृहप्रकल्पांना रोखण्यासाठी सरकारने अखेर कडक भूमिका घेतली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडलेल्या महत्त्वपूर्ण फेरआढावा बैठकीत १५ दिवसांची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली. या निर्णयामागे मावळचे आमदार सुनील शेळके यांचा ठोस आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा कारणीभूत ठरला आहे.
 नियमबाह्य प्रकल्पांना पूर्णत्वाचे दाखले, नागरिक त्रस्त
PMRDA क्षेत्रात विकासकांकडून नियमबाह्य बांधकामे करून पूर्णत्वाचे दाखले मिळवले जात असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून समोर येत होत्या. नागरिकांना दूषित पाणी, सांडपाण्याची प्रक्रिया नसणे, बेसिक नागरी सुविधांचा अभाव अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक प्रकल्पांमधून थेट पवना व इंद्रायणी नद्यांमध्ये सांडपाणी सोडले जात आहे, ज्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे.


आमदार शेळके यांची प्रखर भूमिका

विधानसभेत हे मुद्दे आमदार सुनील शेळके यांनी जोरदारपणे मांडले. त्यानंतर १९ जून रोजी झालेल्या बैठकीत संबंधित प्रकल्पांची यादी आणि कारवाईचा तपशील आठ दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आजच्या बैठकीत पुढे पाऊल टाकण्यात आले.
 १५ दिवसांत कठोर कारवाईचे आदेश
विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर कोणतीही तडजोड मान्य केली जाणार नाही.” त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना १५ दिवसांत नियमबाह्य प्रकल्पांवर ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
बैठकीस वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीस डॉ. योगेश म्हसे (PMRDA आयुक्त), शेखर सिंह (PCMC आयुक्त), सुरेंद्र नवले (उपविभागीय अधिकारी मावळ), विक्रम देशमुख (तहसीलदार मावळ) यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सखोल चर्चा आणि अहवाल सादर केल्यानंतरच ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली.
 काय अपेक्षित?
या निर्णयामुळे आता मावळ, मुळशी आणि PMRDA क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित पाणी, कायदेशीर घरे, स्वच्छता सुविधा आणि पर्यावरण रक्षण यांचा लाभ होण्याची अपेक्षा आहे. विकासकांच्या मनमानीवर लगाम बसेल आणि गृहखरेदीदारांना योग्य न्याय मिळेल.