मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसने भरधाव वेगाने जात असताना समोर चाललेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत बसचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३ प्रवासी गंभीर तर ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघात कसा घडला?
घटना लोणावळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत किलोमीटर ४९ वर घडली. एसटी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस थेट कंटेनरवर आदळली. धडकेची तीव्रता इतकी होती की बसचालक वाहनात अडकून पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
मदतीला धावले हाजी अराफत शेख
या घटनेनंतर एक महत्त्वाची बाब म्हणजे, अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अराफत शेख हे त्याच वेळी मुंबईच्या दिशेने जात होते. त्यांनी आपल्या ताफ्यासह गाड्या थांबवून तात्काळ मदतीला धाव घेतली. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करून दिले.
जखमींवर उपचार सुरू
३ प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ५ जखमींना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. यापैकी काही प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले आहे.
तपास सुरू…
घटनेचा अधिक तपास लोणावळा पोलीस आणि PSI वाणी, खंडाळा पोलीस स्टेशन करत आहेत. अपघाताचे नेमके कारण, चालकाचा झोप लागणे की ब्रेक फेल होणे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
अपघाताने पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दरवर्षी शेकडो अपघात होतात. वेगमर्यादा, रस्त्यांची गुणवत्ता आणि चालकांच्या सतर्कतेचा अभाव यामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात येतात. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.