Home Breaking News MLA निवासातील जेवणावरून मोठा राडा! आमदार संजय गायकवाड यांची कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण

MLA निवासातील जेवणावरून मोठा राडा! आमदार संजय गायकवाड यांची कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण

मुंबई – विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच मंगळवारी रात्री आकाशवाणी आमदार निवासात एक धक्कादायक घटना घडली. *शिवसेना (शिंदे गट)*चे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील जेवण निकृष्ट असल्याच्या कारणावरून थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात गायकवाड कर्मचाऱ्याला डाळ वास घेण्यासाठी जबरदस्ती करत, त्यानंतर थेट थप्पड मारताना दिसत आहेत.
व्हायरल व्हिडीओत काय घडलं?
संजय गायकवाड यांना डाळ सडलेली वाटली. त्यांनी आधी कॅन्टीन व्यवस्थापकाला बोलावले, त्याला वरणाचा वास घेण्यास सांगितले. त्यानंतर व्यवस्थापकाने ते वरण खराब असल्याचे मान्य केल्यानंतर गायकवाडांचा राग अनावर झाला आणि त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काही थांबले नाहीत. त्यांनी या प्रकरणी फूड डिपार्टमेंटला ही डाळ तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले.
 संजय गायकवाड यांचे स्पष्टीकरण:
“मी वरण-भात खाल्ला आणि पहिल्याच घासात उलटी झाली. वरण सडलेले होते. मी आधीही तक्रार केली होती, पण दुर्लक्ष झाले. नॉनव्हेज १५ दिवसांचे असते, सडलेले पदार्थ देऊन आमच्या जिवाशी खेळ होत होता, त्यामुळे मी संतापलो,” असे गायकवाड म्हणाले.
त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ते सामान्यांचीही काळजी घेतात आणि जर आमदारालाही असं अन्न मिळत असेल तर सामान्यांच्या वाट्याला काय येत असेल?
 समाजात संमिश्र प्रतिक्रिया:
या घटनेवर दोन बाजूंचा दृष्टिकोन समोर येतो आहे. काहींनी गायकवाडांच्या संतापाला पाठिंबा दिला आहे आणि खराब जेवण देणाऱ्या कॅन्टीनवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तर दुसरीकडे, एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून वागावे लागते, असे मत व्यक्त केले जात आहे.
 अधिवेशनात जेवणाचा मुद्दा गाजणार:
ही घटना केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर आजच्या विधानसभेच्या कामकाजातही ‘जेवणाचा दर्जा’ हा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्षांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
 कायद्यातून न्याय की रागातून हिंसा?
संजय गायकवाड यांचं वर्तन हा राजकीय शिस्तीचा आणि लोकशाही मूल्यांचा मुद्दा बनत चालला आहे. एकीकडे ‘खराब अन्न’ हा आरोग्याचा आणि सुरक्षेचा गंभीर विषय आहे, पण त्यावरचा उपाय कायदा हातात घेऊन मारहाण करणे असू शकतो का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.