Home Breaking News मुंबईतील तरुण सीएचा खळबळजनक आत्महत्येचा प्रकार: ब्लॅकमेलिंगमुळे ३ कोटींचा तोटा, वैयक्तिक व्हिडीओ...

मुंबईतील तरुण सीएचा खळबळजनक आत्महत्येचा प्रकार: ब्लॅकमेलिंगमुळे ३ कोटींचा तोटा, वैयक्तिक व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

164
0
३२ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट राज मोरे याने गिळले विष; तीन पानी चिठ्ठीत दिले आरोपींचे नाव, मनाची घालमेल शब्दांत व्यक्त
मुंबई – यशवंतनगर, सांताक्रूझ परिसरातील रहिवासी असलेल्या राज मोरे (वय ३२) या तरुण चार्टर्ड अकाउंटंटने वैयक्तिक व्हिडीओच्या आधारे झालेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या १८ महिन्यांत त्याच्याकडून तब्बल ३ कोटी रुपयांची लूट केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
राज मोरे याने आत्महत्येपूर्वी तीन पानी चिठ्ठी लिहून आपल्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांची नावे स्पष्ट केली आहेत. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी राहुल परवानी आणि साबा कुरेशी या दोघांविरोधात खंडणी आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सुसाईड नोटमध्ये व्यक्त झालेली वेदना…
राज मोरेने आपल्या चिठ्ठीत लिहिलं –
“आई, मी तुझ्या अपेक्षांचं ओझं पेलू शकलो नाही. मला माफ कर. माझ्या खात्यांमधील पॉलिसीचे पैसे घेऊन आईकडे दे. पूनम मावशी, कृपया आईची काळजी घ्या…
“माझ्या आत्महत्येसाठी राहुल परवानी आणि साबा कुरेशी जबाबदार आहेत. त्यांनी मला दीर्घकाळ ब्लॅकमेल करून माझी संपूर्ण बचत आणि कंपनीतील रक्कम लुटली…”
त्याने एका सहकारी महिलेला उद्देशून देखील लिहिलं –
“दीपा लाखानी, मी तुमचा विश्वास घात केला याची खंत आहे. श्वेता आणि जयप्रकाश यांचा यामध्ये काहीही सहभाग नव्हता, त्यांच्यावर कृपया कारवाई करू नका…”
गुन्ह्याचा धागा: आर्थिक फसवणूक, मानसिक त्रास, प्रतिष्ठेचा गळा घोटला
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना राज मोरेचे शेअर बाजारातील गुंतवणूक आणि त्याची उंच पगाराची नोकरी याची पूर्ण कल्पना होती. त्यांनी त्याच्या वैयक्तिक व्हिडीओच्या आधारे त्याला सतत ब्लॅकमेल केले. इतकंच नव्हे तर त्यांनी राजकडून कंपनीच्या खात्यांतून पैसा ट्रान्सफर करायला लावला, तसेच एक आलिशान गाडीही हिसकावून घेतली.
राजची आई म्हणाली की, गेल्या काही महिन्यांपासून तो तीव्र मानसिक तणावात होता. मात्र यामागे इतकं गंभीर प्रकरण दडलेलं असेल, याची कुणालाच कल्पना नव्हती.
 आत्महत्येचा दुर्दैवी निर्णय : समाजाला आरसा दाखवणारी घटना
ही घटना केवळ आर्थिक फसवणुकीची नाही, तर ती समाजात वाढणाऱ्या मानसिक आरोग्याच्या समस्यांची आणि सायबर ब्लॅकमेलिंगच्या धोक्यांची जाणीव करून देणारी आहे. राज मोरे याने शेवटी निवडलेला मार्ग दुर्दैवी असला तरी त्यामागे असलेली वेदना, सामाजिक दबाव आणि गृहित धरलेली प्रतिष्ठा या सगळ्यांचा गहिरा आरसा त्याच्या चिठ्ठीतून उमटतो.