सेनेने खुला केलेला पूल पुन्हा बंद; जनतेची फसवणूक की राजकारण? राजू पाटील यांनी केली पाहणी
कल्याण-डोंबिवली – शहरातील बहुप्रतीक्षित आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पलावा पूल राजकीय वादाचा केंद्रबिंदू ठरत आहे. शिंदे गटाच्या सेनेकडून रविवारी प्रवाशांसाठी उघडण्यात आलेला हा पूल अवघ्या काही तासांतच पुन्हा बंद करण्यात आला, आणि यावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे.
या घडामोडीनंतर मनसेचे नेते व माजी आमदार राजू पाटील यांनी सोमवारी सकाळी पुलाची पाहणी केली आणि सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. त्यांनी म्हटले, “हा पूल केवळ फोटोसेशनसाठी उघडण्यात आला होता का? लोकांच्या जिवाशी खेळण्याचे हे राजकारण आम्ही सहन करणार नाही.”
ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आवाज उठवत यास “शिंदे गटाची नौटंकी” असे संबोधले. “सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या भावना डावलल्या आहेत. पूल उघडायचा की नाही, हे तरी स्पष्ट करा!” अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून प्रशासनाच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनावर सवाल उपस्थित केले आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकारातून श्रेय लाटण्याचे राजकारण रंगले आहे. मात्र नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत गंभीर प्रकरण असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.