चिंचवड स्टेशन: श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर, चिंचवड स्टेशन या शाळेत दिनांक ५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त विविध उपक्रमांनी सजलेला भक्तिमय शालेय पालखी सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. टाळ, मृदुंग, फुगडी, रिंगण, दिंडी या वारकरी परंपरेच्या प्रत्येक घटकास विद्यार्थ्यांनी जिवंत ठेवत वारकरी संप्रदायाची सुंदर अनुभूती दिली.
या वेळी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, संत नामदेव यांचे वेश परिधान करून विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिकवणी आणि विचारांचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे, विठ्ठल-रुक्मिणी रूपातील विद्यार्थ्यांची झलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. परिसरात ‘ज्ञानोबा माऊली महाराज की जय’, ‘तुकाराम महाराज की जय’ अशा घोषणांनी वातावरण भक्तिरसात न्हालं.

दिंडीत टाळकरी, वारकरी, तुळशीवृंद, पताका पथक यासारख्या पारंपरिक घटकांचा समावेश होता. मुलांनी फुगडी आणि रिंगण या पारंपरिक खेळांमधून आनंद व्यक्त केला. या उत्सवात अध्यात्मासोबत सामाजिक जाणीवेचा ही सुरेख समन्वय दिसून आला.
“आरोग्य दिंडी” या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी पोषण, स्वच्छता व योगाचे महत्त्व सांगणारे फलक हातात घेतले आणि परिसरात जनजागृती घडवली. ‘आरोग्यम् धनसंपदा’ या भावनेने प्रेरित उपक्रमाला पालकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक आणि नागरिकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
मुख्याध्यापिका सौ. वर्षा काटकर मॅडम यांनी सर्व शिक्षकवृंदांसह परिश्रम घेत आयोजकतेची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.
श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे मानद सचिव ऍड. मा. राजेंद्रकुमारजी मुथा आणि सहाय्यक सचिव मा. अनिलकुमारजी कांकरिया यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याचे प्रभारी मुख्याध्यापिका सौ. काटकर यांनी सांगितले.
हा भक्तिभाव, परंपरा आणि सामाजिक जाणीव यांचा संगम असलेला उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनामनात संस्कारांची बीजं रोवून गेला.




