पिंपरी-चिंचवड : पवना धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या साठ्यात मोठी वाढ झाली असून, धरण प्रशासनाने आज (दि. ६ जुलै) सकाळी ८ वाजल्यापासून पवना नदीपात्रात ८०० क्युसेक्सने विसर्ग सुरू केला आहे. यामुळे नदीकाठच्या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
धरण पूरनियंत्रण कक्षाच्या सूचनेनुसार, सध्याचा पाणीसाठा ७४.६४% इतका भरलेला आहे. पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाची स्थिती कायम आहे, त्यामुळे धरणात नव्याने येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी ४०० क्युसेक्सने विसर्ग सुरू होता, मात्र वाढत्या येव्यानुसार तो दुप्पट करून ८०० क्युसेक्स करण्यात आला आहे.
धरण प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार, पुढील काही तासांमध्ये पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी किंवा अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पवना नदीकाठच्या नागरिकांनी अत्यंत सतर्क राहणे गरजेचे आहे.
सुरक्षिततेसाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी:
कोणीही नदीपात्रात जाऊ नये.
शेतीची अवजारे, मोटार पंपे, जनावरे इत्यादी तातडीने सुरक्षित स्थळी हलवावीत.
सखल भागातील नागरिकांना तात्काळ सतर्कता सूचना देण्यात याव्यात.
स्थानिक प्रशासनास व जलसंपदा विभागास सहकार्य करावे.
शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून, PMPML बस स्थानके, सखल वस्त्या, पूल परिसर, घाटांचे भाग याठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर अफवांवर विश्वास ठेवू नये व केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरी, काळेवाडी या परिसरांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालिकेच्या स्थानिक यंत्रणांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी देखील तत्पर राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.





