Home Breaking News घरफोडी प्रकरणातील पाहिजे आरोपीला गुन्हे शाखा युनिट ३ कडून अटक; सहा वर्षांपासून...

घरफोडी प्रकरणातील पाहिजे आरोपीला गुन्हे शाखा युनिट ३ कडून अटक; सहा वर्षांपासून होता फरार!

पुणे शहरातील गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने एक मोठी कामगिरी बजावत, घरफोडीप्रकरणातील गेल्या सहा वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर जेरबंद केला आहे. ही धडक कारवाई दिनांक ३० जून २०२५ रोजी वानवडी परिसरात करण्यात आली, ज्यामुळे पोलिसांच्या तपासात एक मोठे यश मिळाले आहे.

गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार अमित बोडरे व चेतन शिरोळकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत एक महत्त्वाची माहिती मिळाली. सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे दाखल गु.र.नं ३३१/२०१९, कलम ४५४, ३८० या घरफोडीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अंगदसिंग अजमेरसिंग कल्याणी (वय ४१, रा. थेऊर फाटा, पुणे) हा सध्या वानवडी परिसरात दिसून आल्याचे सांगण्यात आले.

पोलीस पथकाने तत्काळ कारवाई करत रामटेकडीतील कोठारी शोरूमशेजारील गल्लीमध्ये शोधमोहीम राबवली, आणि संशयित आरोपीला तिथे पकडण्यात यश आले. गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांच्या टपावर असलेल्या या आरोपीला अटक केल्यामुळे शहरातील इतर घरफोडी प्रकरणांतील माहिती मिळण्यास मदत होणार आहे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

ही उल्लेखनीय कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (आर्थिक व सायबर गुन्हे) श्री. विवेक मासाळ, तसेच मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे १) श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उप-निरीक्षक गणेश फरताडे, अंमलदार मुकुंद तारु, अमित बोडेरे, अमोल काटकर, कैलास लिम्हण, चेतन शिरोळकर यांनी महत्वाची भूमिका बजावली.

शहरात सध्या वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, अशा प्रकारची कारवाई पोलिसांच्या प्रभावी तपास यंत्रणेचे निदर्शक ठरत आहे.