Home Breaking News रस्त्याच्या कडेला उभा होता मेफेड्रोन विक्रेता; अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

रस्त्याच्या कडेला उभा होता मेफेड्रोन विक्रेता; अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेने केलेल्या धाडसी कारवाईत तब्बल ₹३.७८ लाखांच्या मेफेड्रोन (एम.डी.) अंमली पदार्थासह एक जण अटकेत घेतला आहे. या कारवाईमुळे रस्त्याच्या कडेला उभा राहून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

दिनांक ३० जून २०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे अधिकारी आणि अंमलदार पेट्रोलिंग करत असताना, रास्ता पेठेतील उंटाडया मारुती मंदिराच्या पाठीमागे, के.एम हॉस्पीटलजवळील भिंतीकडे संशयास्पद हालचाली करणारा इसम आढळला. त्याचे नाव आकिब अशफाक शेख (वय २८ वर्षे, रा. भवानी पेठ, पुणे) असे असून, त्याच्याकडे घेतलेल्या झडतीत १८ ग्रॅम ६७ मिलीग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ सापडला, ज्याची किंमत ₹३,७३,४००/- इतकी आहे.

तसेच त्याच्याकडून एक मोबाईल फोन व इतर साहित्यही जप्त करण्यात आले असून एकूण मुद्देमालाची किंमत ₹३,७८,४००/- इतकी आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८(क), २२(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (आर्थिक व सायबर गुन्हे) श्री. विवेक मासाळ, व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे १) श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या धडक कारवाईत पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे व त्यांच्यासोबत विशाल दळवी, सचिन माळवे, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, दयानंद तेलंगे, सर्जेराव सरगर, सुहास डोंगरे, विपुन गायकवाड, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, रेहाना शेख, स्वप्नील मिसाळ यांनी सहभाग घेतला.

या घटनेमुळे शहरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, पुणे पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथक सतत सावध असून अशा बेकायदेशीर कामकाजांवर कडक कारवाई करत आहे.