पुण्यातील बंडगार्डन रेल्वे स्टेशनबाहेर दिनांक ११ जून २०२५ रोजी घडलेली ७४० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची जबरी चोरीची घटना शहरातील खळबळजनक गुन्ह्यांपैकी एक ठरली होती. सदर घटनेत मुंबईवरून आलेल्या पुण्यातील नामांकित सोनं पेढी शोरूमच्या प्रतिनिधीकडून तब्बल ₹६९ लाख किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १८६/२०२५ भा.दं.वि. कलम ३९२, ३४ तसेच शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेच्या गंभीरतेची दखल घेत गुन्हे शाखा युनिट ०२ चे पथक तपासात गुंतले. तपासादरम्यान या गुन्ह्यामागे राजस्थानमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार रूपसिंग गुलाबसिंग रावत (वय ३१, रा. जिल्हा राजसमंद, राजस्थान) याचा हात असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीस अटक करणे आव्हानात्मक ठरले कारण तो सतत राज्याबाहेर राहत होता आणि पोलिसांच्या सापळ्यातून निसटत होता.
पोलीस उपनिरीक्षक आशिष कवठेकर व पथकाने गुप्त बातमीदारांच्या मदतीने, स्थानिक राजस्थान पोलिसांच्या सहकार्याने, दिवेर (राजस्थान) येथे सापळा रचत आरोपीला दिनांक २६ जून २०२५ रोजी अटक केली. त्याच्याकडून २४९.५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, किंमत ₹१८,६६,०००/- असे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या या धाडसी आणि कार्यक्षम तपासामुळे या गुन्ह्याचे मोठे गुंतागुंतीचे जाळे उलगडले गेले असून, उर्वरित चोरीस गेलेल्या सोन्याचा शोधही सुरू आहे. हा तपास आणि अटक पुढील गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, व आर्थिक गुन्हे व सायबर गुन्हे विभागाचे प्रभारी श्री. विवेक मासाळ तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यामध्ये वरीष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, प्रताप मानकर, सपोनि आशिष कवठेकर, अमोल रसाळ, व तपास पथकातील अंमलदार संजय जाधव, शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, गणेश थोरात, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, ओमकार कुंभार, अमोल सरडे, विनोद चव्हाण, नागेश राख, पुष्पेंद्र चव्हाण, संतोष टकले, विजय पवार, संजय आबनावे यांचा समावेश होता.
पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईमुळे शहरवासीयांत समाधान व्यक्त होत आहे. या कामगिरीने पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.