पुणे | हडपसर — अंमली पदार्थांचे जीवनावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन (२५ जून) निमित्त हडपसर पोलीस स्टेशन आणि विविध शाळा-महाविद्यालयांच्या सहकार्याने दोन दिवसीय जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हे अभियान मा. पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
“नशा मुक्त भारतासाठी” पोलीसांचा पुढाकार
हडपसर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील अण्णासाहेब मगर महाविद्यालय, एस.एम. जोशी कॉलेज, साधना कन्या विद्यालय, मेंटोर इंटरनॅशनल स्कूल, एसएनबीपी स्कूल मांजरी या शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम राबविण्यात आले. यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन नशामुक्तीसाठी घेतली शपथ.
कार्यक्रमांमधील मुख्य उपक्रम:
व्यसन म्हणजे काय? आणि त्याचे प्रकार
अंमली पदार्थांची ओळख आणि दुष्परिणाम
आरोग्यावर होणारे परिणाम व कायदेशीर कारवाईची माहिती
पालकांनी व विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी
शासकीय व स्वयंसेवी व्यसनमुक्ती केंद्रांची माहिती
पथनाट्य सादरीकरण – पी.एम.टी. गाडीतळ येथे प्रभावी सादरीकरण
पथनाट्याद्वारे प्रभावी जनजागृती
हडपसर परिसरातील मुख्य ठिकाणी – पीएमटी बस स्टॉप व सार्वजनिक स्थळांवर पथनाट्य सादर करून सामान्य नागरिकांमध्ये देखील अंमली पदार्थांबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. पथनाट्यातून ‘व्यसन एक मानसिक गुलामी’ या संकल्पनेवर आधारित संदेश दिला गेला.
६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग!
या दोन दिवसांच्या कार्यक्रमात सुमारे ६००० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यांच्या मनात अंमली पदार्थांविषयी समज निर्माण करून त्यांच्यात सकारात्मक विचारांचं बीज रोवण्यात हडपसर पोलिसांना यश आले.
तात्काळ मदतीसाठी 112 वर कॉल करा!
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना टोल-फ्री क्रमांक 112 विषयी माहिती देण्यात आली. अंमली पदार्थ, सायबर गुन्हे, महिला अत्याचार अशा कोणत्याही संकटाच्या प्रसंगी त्वरित पोलिस संपर्कासाठी या क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
पोलिसांचे अथक परिश्रम आणि समर्पण
ही संपूर्ण मोहीम मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली गेली. कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोनि निलेश जगदाळे, अश्विनी जगताप, म. सपोनि हसिना शिकलगार, पोउनि महेश कवळे, समीर पांडुळे, सचिन शिंदे, तेजस पांडे, दिपिका जौंजाळ, प्रकाश सावंत, स्वप्निल भुजबळ, धनश्री बांडे आदींनी मोलाची भूमिका बजावली.