Home Breaking News लग्नाचे आमिष, आंतरराष्ट्रीय फसवणूक – ३.६० कोटींचा गंडा घालणाऱ्या ‘डॉ. ओबेरॉय’चा पर्दाफाश!

लग्नाचे आमिष, आंतरराष्ट्रीय फसवणूक – ३.६० कोटींचा गंडा घालणाऱ्या ‘डॉ. ओबेरॉय’चा पर्दाफाश!

पुणे | ऑनलाईन मॅट्रिमोनियल साईटवरून विश्वास संपादन करून लग्नाचे आमिष दाखवत एका महिलेची तब्बल ₹३.६० कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बनावट नावाने shaadi.com वर प्रोफाईल तयार करून महिलांशी ओळख वाढवणाऱ्या डॉ. रोहित ओबेरॉय उर्फ अभिषेक शुक्ला (रा. लखनऊ, सध्या पर्थ, ऑस्ट्रेलिया) याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. या प्रकरणात इतर आंतरराष्ट्रीय आरोपींचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.

फसवणुकीचा सखोल कट – प्रेमाचे नाटक आणि कोटींची फसवणूक

पुण्यात खराडी येथे वास्तव्याला असलेल्या दिल्लीतील महिलेने shaadi.com वर २०२३ मध्ये प्रोफाईल तयार केली होती. तेव्हा SH87341231 या प्रोफाइलवरील ‘ऑस्ट्रेलियन डॉक्टर’ रोहित ओबेरॉयने तिला संपर्क केला. काही महिन्यांतच ओळख वाढवत रोहितने मैत्री, सहवास आणि लग्नाचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला.

या महिलेच्या पहिल्या घटस्फोटानंतर तिला मिळालेल्या ₹५ कोटींच्या पोटगीबाबत माहिती मिळताच, आरोपीने तिच्या Mindfulness आणि Spirituality व्यवसायाच्या नावाखाली सीटी बँक सिंगापूर व भारतातील बँकांमधून ₹३.६० कोटी रुपये फसवले.

‘डॉ. ओबेरॉय’ नव्हे, ‘अभिषेक शुक्ला!’ – खोलात जाणारा तपास

पिडीत महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सायबर क्राईम पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणातून रोहित ओबेरॉय हे नाव खोटे असल्याचे आणि खरी ओळख अभिषेक शरदचंद्र शुक्ला (वय ४२) अशी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याचे Look Out Circular (LOC) जाहीर केले आणि तो २५ जून रोजी सिंगापूरहून भारतात येताच मुंबई विमानतळावर ताब्यात घेतला.

३१९४ महिलांशी संपर्क! – धोके अजून उघड व्हायचे बाकी

अभिषेक शुक्ला याने shaadi.com वरून ३,१९४ महिलांना लग्नाचे आमिष दाखवत संपर्क केला असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. त्यामुळे देशभरातील अनेक महिलांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे.

कारवाईचे श्रेय – पुणे पोलिसांची कौतुकास्पद भूमिका

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, आणि सायबर पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. विशेष पथकात स्वप्नाली शिंदे, सुशिल डमरे, बाळासाहेब चव्हाण, सतीश मांढरे, प्रिती मोरे, सुजाता दांगट यांचा समावेश होता.

महिलांसाठी महत्त्वाच्या सूचना – सायबर पोलिसांचे आवाहन

shaadi.com प्रोफाईल नं. SH87341231 या प्रोफाईलवरून संपर्क करून फसवणूक झाल्यास मो. 7058719371 / 75 वर संपर्क करा.

मॅट्रिमोनियल साईटवर ओळखी करताना शहानिशा करावी, कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी सतर्क राहावे.

बाहेरील देशातील नागरिक असल्याचे सांगून कस्टममध्ये अडकल्याचा बनाव करून पैसे मागणाऱ्यांना पैसे देऊ नयेत.

फसवणुकीस तोंड दिल्यास तात्काळ www.cybercrime.gov.in, १९३० किंवा १९४५ वर संपर्क साधावा.

‘ऑस्ट्रेलियन डॉक्टर’च्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक – shaadi.com प्रकरणात धक्कादायक खुलासे!