पुणे | शहरात अंमली पदार्थांच्या साखळीविरोधात मोठी कारवाई करत पुणे पोलिसांनी एक मोठी टोळी जेरबंद केली आहे. स्वारगेट बस स्थानक परिसरात सापळा रचून एका संशयितास अटक करण्यात आली असून त्याच्या चौकशीतून इतर दोन साथीदारांची माहिती व १६ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल उघडकीस आला आहे.
स्वारगेट येथे संशयिताची बॅग तपासली असता गांजा आढळला
दि. १९ जून २०२५ रोजी, पोलीस अंमलदार राहुल होळकर व विक्रम सावंत यांना गोपनीय माहिती मिळाली की स्वारगेट बस स्थानकावर एक तरुण अंमली पदार्थ घेऊन उभा आहे. तत्काळ कारवाई करत सापळा रचण्यात आला. पंढरपूर बस स्टॉपजवळ पोलिसांनी आरोपी नितीन नरसिंह पाल (वय २३, रा. वेळापूर, सोलापूर) याला पकडले. त्याच्याकडील चॉकलेटी बॅगेमध्ये ६ किलो गांजा आढळून आला.
दोन साथीदारांची माहिती – टोळी मागे सक्रिय नेटवर्क
चौकशीत नितीन पालने सांगितले की, सदर गांजा अल्ताफ तांबोळी व विठ्ठल ऊर्फ दादा शिवपाल या दोघांच्या मदतीने पुण्यात विक्रीसाठी आणला होता. या दोघांचे वेळापूर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे वास्तव्य असून ते मूळ तस्करीच्या जाळ्याचे केंद्र होते.
इनोव्हा गाडीत लपवलेला अतिरिक्त गांजा व मोबाइल जप्त
ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उप आयुक्त स्मार्तना पाटील, आणि सहाय्यक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विशेष पथकात पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, पोलीस उपनिरीक्षक सुर्यांकात सपताळे, आणि पोलीस अंमलदार राहुल होळकर, विक्रम सावंत, फिरोज शेख, सुजय पवार, नवनाथ शिंदे, तसेच महिला पोलीस प्रीती मोरे, सुजाता दांगट, इत्यादींनी सहभाग घेतला.
अंमली पदार्थविरोधी मोहिमेला गती – आणखी जाळं उघडकीस येण्याची शक्यता
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी राज्याबाहेरही कार्यरत असू शकते, त्यामुळे सखोल तपास सुरू आहे. पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा शहर अंमली पदार्थमुक्त ठेवण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल उचलले आहे.
स्वारगेट येथे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अंमली पदार्थ तस्कर टोळी जेरबंद, इनोव्हा गाडीसह १६.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त