तळेगाव दाभाडे (पुणे) – तळेगाव एमआयडीसी परिसरातील औद्योगिक कंपन्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली जेसीबी कंपनीच्या मिटिंग हॉलमध्ये भव्य आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ५० पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. उद्योजकांची सुरक्षा, वाहतूक आणि पायाभूत सुविधा यावर भर देत आयुक्तांनी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेतले व तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीत नवलाख उंबरे आणि जाधववाडी रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी, अपघात, रस्त्यांची दुरवस्था, रस्ते रुंदीकरणासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण यासह अनेक गंभीर मुद्द्यांवर चर्चा झाली. संबंधित वाहतूक पोलिस, एमआयडीसी, एमएसईबी अधिकारी यांनी उपाययोजनांचे तपशील दिले.
आयुक्त चौबे यांनी सांगितले की, “उद्योगांच्या अडचणी सोडवण्यासाठी इंडस्ट्रियल ग्रिव्हियन्स सेल स्थापन करण्यात आलेला आहे. उद्योजकांनी कोणतीही समस्या न लपवता प्रशासनाशी संपर्क साधावा.” त्यांनी सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था सुधारण्याचे आवाहन केले व कामगारांसाठी हेल्मेट सक्तीबाबतही निर्देश दिले.
बैठकीनंतर आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हुंदाई कंपनीला भेट दिली, पॅन्ट हेड शाम सिंग यांच्याशी चर्चा करून कंपनीतील कामकाज, सुरक्षा व्यवस्था यांचा आढावा घेतला. सुरक्षा दृष्टीने आवश्यक सुधारणा सुचवून त्यांनी उद्योगांना सहकार्याची ग्वाही दिली.
या बैठकीस पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे, महावितरणचे जयप्रकाश सागरे व प्रशांत पवार, एमआयडीसीचे राजेश धोत्रे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित जाधव, पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी आणि वाहतूक विभागाचे गणेश लोंढे उपस्थित होते.
महत्त्वाचे मुद्दे:
तळेगाव एमआयडीसीमधील उद्योजकांच्या समस्या थेट पोलिस आयुक्तांकडून ऐकून घेतल्या
वाहतूककोंडी, अपघात, वीज आणि पायाभूत सुविधा यावर सखोल चर्चा
उद्योजकांसाठी “इंडस्ट्रियल ग्रिव्हियन्स सेल” कार्यरत