Home Breaking News “हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरेंचा एल्गार! ५ जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा; मराठीचा...

“हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरेंचा एल्गार! ५ जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा; मराठीचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार”

126
0

मुंबई – राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पाचवीपर्यंत हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भूमिका घेतली आहे. “ही भाषिक आणीबाणी आहे आणि ती आम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी राज्य सरकारला थेट आव्हान दिलं आहे.

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने याआधी ६ जुलै रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्या दिवशी एकादशी असल्यामुळे हा मोर्चा आता ५ जुलैला आयोजित करण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरुवात गिरगाव चौपाटी येथून होणार असून सांगता आझाद मैदानावर होईल.

राज ठाकरेंचा स्पष्ट इशारा:
“आमचा कोणत्याही भाषेशी वैर नाही, परंतु हिंदीची सक्ती ही स्वीकारार्ह नाही. लहान मुलांवर भाषा लादणं म्हणजे त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेणं आहे,” असे राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले. तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांना थेट आव्हान देताना, “जर भेटायचं असेल, तर ते आझाद मैदानात यावं, तिथेच मी भेटेल,” असे त्यांनी ठणकावले.

मोर्चा पक्षाच्या पलिकडे:
राज ठाकरे यांनी हे स्पष्ट केलं आहे की, या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, फक्त मराठी माणसाचा आवाज आणि मराठीचा अजेंडा असेल. “पक्ष, विचारधारा बाजूला ठेवून प्रत्येक मराठी भाषाप्रेमीने या लढ्यात सहभागी व्हावं,” असं त्यांनी आवाहन केलं आहे.

शिवसेनाही उतरते मैदानात:
या मुद्यावर ठाकरे गट (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देखील आक्रमक झाला असून, ७ जुलै रोजी आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे राजधानी मुंबईत हिंदी सक्तीच्या विरोधात दोन मोठे मोर्चे होणार आहेत.

 महत्त्वाचे मुद्दे:

५ जुलै रोजी मनसेचा भव्य मोर्चा गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान

हिंदी सक्तीला राज ठाकरेंचा तीव्र विरोध

मोर्चात कोणताही पक्षाचा झेंडा नसेल, फक्त मराठीचा अजेंडा

शिक्षणमंत्र्यांना थेट मैदानात चर्चेचं आवाहन

७ जुलै रोजी ठाकरेसेनेचं स्वतंत्र आंदोलन

मराठी भाषेसाठी लढा – जनतेला एकत्र येण्याचं आवाहन!

“ही केवळ भाषा नाही, ही आमची ओळख, संस्कृती, आणि अस्मिता आहे,” असं सांगत राज ठाकरे यांनी मराठी जनतेला आवाहन केलं की, “मराठी माणसासाठी ही वेळ एकत्र येण्याची आहे.”
राजकारणापलीकडे जाऊन हा लढा भाषिक स्वाभिमानाचा आहे.