Home Breaking News “सेवा हीच खरी वारी!” पुण्यात वारकऱ्यांसाठी मोफत डोळे तपासणी, अल्पोपहार व वस्त्रवाटप...

“सेवा हीच खरी वारी!” पुण्यात वारकऱ्यांसाठी मोफत डोळे तपासणी, अल्पोपहार व वस्त्रवाटप उपक्रम उत्साहात पार पडला

पुणे | २१ जून २०२५ :- पावसाच्या सरींमध्ये हरिभक्त वारकऱ्यांचे पुणे नगरीत स्वागत करत, “सेवा हीच खरी वारी” या संकल्पनेतून एक विलक्षण आणि समर्पित उपक्रम नुकताच पार पडला. आचार्य आनंद ऋषीजी पुणे ब्लड बँक, रंगीलदास सुरतवाला ट्रस्ट, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि सुरतवाला बिजनेस ग्रुप लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात हजारो वारकऱ्यांनी सेवा लाभ घेतला.


मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप

वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत, मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तपासणी केल्यानंतर गरजूंना सुसंगत चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले. हा उपक्रम वयोवृद्ध वारकऱ्यांसाठी विशेष उपयुक्त ठरला.

 सात्विक अल्पोपहाराचे आयोजन

वारकऱ्यांच्या अन्नसेवेच्या पार्श्वभूमीवर साबुदाणा खिचडी, लापशी, बिस्किटे व विशेष चहा देण्यात आला. हजारो भाविकांनी या अल्पोपहाराचा आस्वाद घेत व सेवा करणाऱ्या स्वयंसेवकांचे मन:पूर्वक आभार मानले.

वस्त्रवाटपाची विशेष योजना

स्त्रियांसाठी साड्या, पुरुषांसाठी शर्ट, चप्पल आणि रेनकोट यांचे मोफत वाटप करून वारकऱ्यांची वारी अधिक सुखकर व सुरक्षित व्हावी, हा या उपक्रमामागचा उद्देश होता. अनेकांनी अश्रुपूरित डोळ्यांनी “ही खरी वारी” असल्याचे नमूद केले.

 मान्यवरांचे उपस्थितीत उद्घाटन

या सेवाभावी उपक्रमाचे उद्घाटन संदीपजी पाटील (GST कमिशनर) आणि डॉ. नितीन वाघमोडे (Income Tax कमिशनर) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार मा. मोहनदादा जोशी यांनीही उपस्थित राहून प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

नियोजन आणि समर्पण

या संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी नियोजन चंदन सुरतवाला, सुरेश कांबळे आणि माऊली भक्तमंडळी यांनी पार पाडले. त्यांचे सातत्य, श्रम व श्रद्धा यामुळेच हा उपक्रम इतका प्रभावी ठरला.

 “सेवा म्हणजेच भक्ती” – उपस्थितांची भावना

या उपक्रमात सहभागी झालेल्या अनेक वारकऱ्यांनी आणि पुणेकरांनी “अशी सेवा प्रत्येक वारीत व्हावी” अशी प्रतिक्रिया दिली. पुणे शहरात अशा भक्तिमय सेवेसाठी हृदयपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.