Home Breaking News धाडसी बचाव मोहिम! पोलिसांची ‘मानवी साखळी’ आणि शर्तीचा निर्धार; एका नागरिकाचे प्राण...

धाडसी बचाव मोहिम! पोलिसांची ‘मानवी साखळी’ आणि शर्तीचा निर्धार; एका नागरिकाचे प्राण वाचवले!

106
0

खराडी पोलीस ठाण्याच्या पथकाने दाखवलेली तत्परता आणि धाडसाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. आज मुळा-मुठा नदीवर पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने संबंधित भागात सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर खराडीहून केशवनगरकडे जाणाऱ्या पुलावरील वाहतूक बंद करण्यासाठी पोलीस पथक गेले असता एक धक्कादायक घटना समोर आली.

मोटरसायकलसह बंधाऱ्याच्या मध्यभागी एक इसम अडकलेला दिसून आला. वाढत्या पाण्यामुळे त्याच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. तातडीने फायर ब्रिगेडला संपर्क साधण्यात आला, परंतु परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी कोणतीही वाट न पाहता स्वतः पुढे होऊन जीवाची पर्वा न करता धाडसी पाऊल उचलले.

सपोनि खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार दोरगे, हवालदार सय्यद, अंमलदार गायकवाड, महिला अंमलदार थोरात, मालवंडे, अंमलदार साळके व काळे यांनी दोरीच्या साहाय्याने मानवी साखळी तयार करून त्या अडकलेल्या इसमास सुरक्षितपणे बाहेर काढले. या शर्तीच्या संघर्षातून अखेर नवाज खुर्शीद कोतवाल (वय ३८, रा. तुकाराम नगर, चंदननगर, पुणे) यांचे प्राण वाचवण्यात आले.

या प्रसंगानंतर पोलिसांनी तत्काळ बॅरिकेड्स लावून संबंधित रस्ता पूर्णतः बंद केला असून, नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे आणि आपली सुरक्षितता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

⛔ सळसळत्या प्रवाहात ‘मानवी साखळी’ने वाचवले प्राण!
⛔ पोलिसांचे कर्तव्यबुद्धी आणि धाडसाला सलाम!
⛔ खराडी पोलिसांची तातडीची कारवाई आणि योग्य नियोजनाचे उत्तम उदाहरण