पुणे | कोंढवा – पुणे शहर व उपनगरात अनेक महिन्यांपासून घरफोड्यांच्या घटनांनी नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं. मात्र, कोंढवा पोलिसांनी केलेल्या तडाखेबंद कारवाईमुळे या मालमत्तेवर डोळा ठेवणाऱ्या चोरट्यांचा खेळ खलास झाला आहे. तब्बल १५० पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे ज्याच्यावर नोंदले गेले आहेत, अशा अट्टल चोर अर्जुनसिंग रजपूतसिंग दुधानी (वय ४७, रा. मांजरीगाव, हडपसर) याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
दिनांक ३ ते ४ जून २०२५ दरम्यान कोयंडे आणि कुलूप तोडून एका बंद घरात प्रवेश करून सुमारे २१ तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण अडीच ते तीन लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. फिर्यादी मुळगावी गेल्यानंतर ही घटना घडली होती.
सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष तपास पथके तयार करण्यात आली. या पथकांनी १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज ५ दिवस तपासून चोराचा मागोवा घेतला. १० जून २०२५ रोजी एका गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी मांजरीगाव येथे सापळा रचून आरोपीला अटक केली.
जप्त मुद्देमाल:
४० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र
२० ग्रॅम सोन्याची चैन
₹४०,००० किंमतीची होंडा स्प्लेंडर मोटरसायकल एकूण जप्तीची किंमत: ₹३,४०,०००
या अटक झालेल्या गुन्हेगाराने पुणे शहर व परिसरात १५० पेक्षा जास्त घरफोडीच्या घटना केल्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारच्या अट्टल गुन्हेगारास अटक करणे हे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे द्योतक आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीतून पुढील अनेक प्रलंबित गुन्ह्यांवर प्रकाश पडण्याची शक्यता आहे. सदर आरोपीकडून आणखी चोरीचा ऐवज मिळण्याची शक्यता असून तपास अधिक व्यापक स्तरावर सुरू आहे.
पुणे पोलिसांचे विशेष अभिनंदन!
या कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध झाले की पुणे पोलिस गुन्हेगारांना मुळापासून उखडून टाकण्यासाठी कटीबद्ध आहेत.