पुणे | कात्रज : पुणे शहरातील गुन्हेगारीवर वचक ठेवणाऱ्या ‘कॉप्स २४’ या विशेष पथकाने एक मोठी कामगिरी पार पाडली आहे. खुनाचा कट रचण्यासाठी थांबलेल्या तिघांना अटक करून त्यांच्याकडून गावठी बनावटीचे तीन पिस्तुलं, नऊ जिवंत काडतुसे आणि दोन मॅगझिन्स असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई दि. १५ जून २०२५ रोजी कात्रज परिसरात करण्यात आली. कॉप्स २४ पथकातील पोलीस अंमलदार कृष्णा म्हस्के आणि सौरभ साळवे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांनी हवेली हॉटेलच्या अलीकडे, श्रीलक्ष्मी गॅरेज समोर संशयित हालचाली करणाऱ्या तिघांना पकडले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये निखिल मुकेश तुसाम (वय १९, रा. कोथरुड), अनिकेत संजय मालपोटे (वय २२, रा. कोथरुड) आणि एक विधीसंघर्षीत बालक यांचा समावेश आहे.
पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, ही तिघे कात्रज घाटात एका व्यक्तीचा खून करण्यासाठी थांबले होते. त्यांच्याकडून मिळालेली शस्त्रसामग्री बेकायदेशीर असून त्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (गु. र. नं. २९१/२०२५), भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम), श्री. राजेश बनसोडे, गुन्हे शाखेचे अपर आयुक्त श्री. पंकज देशमुख, डीसीपी गुन्हे श्री. निखील पिंगळे, डीसीपी परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, श्री. प्रताप मानकर, श्री. राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि कॉप्स २४ पथकातील सर्व पोलीस कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग आहे.
ही कारवाई केवळ एक गुन्हा उघडकीस आणणारी नसून, पुणे शहरातील संभाव्य गंभीर गुन्ह्याला वेळीच अटकाव करणारी ठरली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे.
🔻महत्त्वाचे मुद्दे:
तीन पिस्टल, ९ काडतुसे, २ रिकामी मॅगझिन जप्त
कात्रज घाटात खून करण्याचा कट उघड
तीन जणांना अटक – त्यापैकी एक अल्पवयीन
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा दाखल
तपासाची दिशा आणखी गंभीर गुन्ह्यांकडे वळण्याची शक्यता