पुणे | वाघोली पोलीस स्टेशन – पुणे शहरात खळबळ उडवणाऱ्या एका अपहरण आणि खंडणी प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावत वाघोली पोलिसांनी शिताफिने चार सराईत आरोपींना जेरबंद केले. अपहरण करून १५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत अपहृत व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
दिनांक १५ जून २०२५ रोजी, फिर्यादीचे चुलत भाऊ वाघोली पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी कळवले की, “माझ्या चुलत भावाचे कोणी तरी अपहरण केले असून व्हॉट्सअॅप कॉलवरून १५ लाख रुपये खंडणी मागण्यात आली आहे.” पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत तपास पथक तातडीने कार्यान्वित केले.
तपासाची नाट्यमय कामगिरी:
पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, अंमलदार प्रदीप मोटे, पांडुरंग माने, दीपक कोकरे, विशाल गायकवाड, साई रोकडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने डमी पैशांची बॅग आणि डमी वाहनासह देहू रोड परिसरात सापळा रचला. दोन आरोपी दुचाकीवर आले आणि डमी व्यक्तीकडून बॅग घेण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना शिताफिने ताब्यात घेतले.
अटक आरोपींची नावे:
गौरव राजू कांबळे
ऋषीकेश किशोर शिंदे
इरफान खान
अतहर सोहेल अनवर
पोलिसांनी गौरव कांबळेच्या मोबाईलवरून अपहृत व्यक्ती ताब्यात असलेल्या दुसऱ्या आरोपींना “पैसे मिळाले” असा बनावट संदेश दिला. त्यानंतर त्यांनी अपहृत व्यक्तीस कासारवाडी मेट्रो स्टेशनबाहेर सोडले. पोलिसांनी लगेच अपहृत व्यक्तीला ताब्यात घेत सुरक्षित पोहोचवले.
अपहृत व्यक्तीची जबानी:
“दि. १४ जून रोजी रात्री १०:३० ते १६ जून पहाटे १:३० वाजेपर्यंत, चार इसमांनी माझे अपहरण करून मला एका स्कॉर्पिओ वाहनात पिंपरी-चिंचवड भागातील एका रूमवर नेले. अक्षय नावाच्या व्यक्तीने २५ लाखापैकी १५ लाख मागून धमकावत मारहाण केली व खंडणीची मागणी केली.”
पोलिसांनी आरोपींविरुद्ध गु. र. नं. २७४/२०२५ भा.दं.वि. कलम ३०८, ३३३, १४०(२), १२७(२), १८९(१)(२), १९० नुसार गुन्हा नोंदवला आहे. तपास अधिक गतीने सुरू असून आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.
वाघोली पोलीस स्टेशनच्या यशस्वी ऑपरेशनमुळे एक मोठा गुन्हा टळला असून, अपहृता व्यक्तीचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.