पुणे | प्रतिनिधी :- हवेली तालुक्यातील थेऊर परिसरात घडलेल्या तब्बल ३ लाख रुपयांच्या तांब्याच्या तारा चोरी प्रकरणाचा लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत शोध लावून, तीन चोरट्यांना अटक करून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला. ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलिस दलासाठी अत्यंत उल्लेखनीय ठरली आहे.
घटना कशी घडली? दि. ६ जून २०२५ रोजी फिर्यादी यांनी त्यांचा टेम्पो मौजे थेऊर गावातील जय मल्हार हॉटेल समोरील मोकळ्या जागेत लावला होता. या टेम्पोत जळालेल्या तांब्याच्या तारांचे ५५ पोते ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता त्यांना टेम्पोतून ९ पोते चोरीला गेल्याचे आढळले, ज्यात ४९५ किलो वजनाचे आणि अंदाजे ₹३,०१,९५०/- किंमतीचे तांब्याचे तारे होते.
फिर्यादीने तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गु.र.नं. २५०/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांचा शोध व अटकेची कारवाई या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र तपास पथके स्थापन करण्यात आली. पोलीस अंमलदार प्रदीप गाडे व राहुल कर्डीले यांनी बातमीदारांमार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचून दि. १० जून २०२५ रोजी तीन चोरट्यांना अटक केली.
अटक करण्यात आलेले आरोपी:
सुरज शाम जाधव (वय १९)
यश अजित सावंत (वय २१)
महेश बसवराज पुजारी (वय २२) सर्व आरोपी हे थेऊर गावातीलच रहिवासी आहेत.
अटक केल्यानंतर चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून संपूर्ण चोरी गेलेला ४९५ किलो तांब्याचा माल हस्तगत करण्यात आला, ही पोलिसांसाठी मोठी यशस्वी मोहीम ठरली आहे.
प्रशंसनीय कामगिरी या कामगिरीसाठी पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली पो.उ.नि. अनिल जाधव आणि त्यांच्या पथकातील अंमलदार – जाधव, सातपुते, वणवे, भोसले, माने, जगदाळे, देवीकर, बारगजे, गाडे, कर्डीले, थोरात इत्यादींचे उल्लेखनीय योगदान राहिले.
ही कामगिरी केवळ चोरांना अटक करण्यापुरती मर्यादित नसून, स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांबाबतचा विश्वास वृद्धिंगत करणारी आणि कायदा व सुव्यवस्था राखणारी ठरली आहे.