पुणे | प्रतिनिधी :- पुणे शहरातील वारजे माळवाडी परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला आव्हान ठरणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट ३ व वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल पथकाने संयुक्तरित्या शिताफीने अटक केली आहे.
दि. ८ जून २०२५ रोजी, बीट मार्शल पथक गस्त घालत असताना फिर्यादी इसमाने आहेरगाव गाव कमानीजवळ पोलिसांना थांबवून माहिती दिली की, त्याच्या मित्रांनी – यशपाल फुलसिंग भाटी (वय २७) आणि राहुल सुखदेव ढवळे (वय २३) – त्याच्यावर दारू न पाजल्याने शिवीगाळ व मारहाण केली असून, त्यांच्याकडे लोखंडी हत्यारे असून ते जीवघेणी धमकी देत आहेत.
फिर्यादीच्या माहितीवरून तातडीने कृती करत रामनगर बीट मार्शल अंमलदार माधव औताडे, गणेश शिंदे आणि शिवाजी भोसले यांनी संबंधित ठिकाणी धाव घेतली आणि यशपाल भाटी व राहुल ढवळे या दोघांना लोखंडी हत्यारांसह रंगेहाथ अटक केली.
या कारवाईमुळे परिसरात काही दिवसांपासून पसरलेल्या दहशतीला चाप बसला असून नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्याविरोधात वारजे माळवाडी पो.स्टे येथे गुन्हा रजि. नं. २४३/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११५(२), ३५१(२)(३), ३५२(३)(५), तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कौशल्यपूर्ण व वेगवान कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-१) श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रंगराव पवार, तसेच वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजित काईंगडे यांच्या देखरेखीखाली पार पडली.
यामध्ये पोलीस अंमलदार माधव औताडे, गणेश शिंदे व शिवाजी भोसले यांनी अतिशय धाडसी आणि तत्परतेने सहभाग घेतला.
ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की, पुणे शहर पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी सतत सज्ज असून गुन्हेगारांना कोणतीही मुभा देणार नाही.