Home Breaking News सायबर फसवणुकीचा पर्दाफाश: सिम्बायोसिसमध्ये प्रवेश देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणारा सराईत आरोपी...

सायबर फसवणुकीचा पर्दाफाश: सिम्बायोसिसमध्ये प्रवेश देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणारा सराईत आरोपी थायलंड पळून जाताना अटक!

पुणे :- पुण्यातील नामवंत शैक्षणिक संस्थेच्या नावाचा गैरवापर करून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा भांडाफोड करत, गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी कामगिरी बजावली आहे. सिम्बायोसिस कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगत ऑनलाइन वेबसाईटद्वारे विद्यार्थ्यांना गंडा घालणारा कुमार कुणाल बिरेंद्रकुमार विद्यार्थी या सराईत गुन्हेगारास थायलंड पळून जाण्याच्या तयारीत असताना कोलकत्ता विमानतळावर अटक करण्यात आली.

सायबर फसवणुकीचा मास्टरमाइंड पकडला

फसवणूक करणाऱ्या या टोळीने सिम्बायोसिस या नावाजलेल्या संस्थेच्या लोगोचा आणि इमारतीचा फोटो वापरून खोटी वेबसाईट तयार केली होती. या वेबसाईटवरून त्यांनी प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळले. यामध्ये दिव्या, आकाश यादव, आणि कुणाल कुमार या तीन परराज्यातील व्यक्तींचा समावेश होता.

या प्रकरणी २ एप्रिल २०२५ रोजी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते.

 तपासाची सखोल मोहीम

पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी दिल्ली, हरियाणा आणि महाराष्ट्रात विशेष पथके पाठवली होती. विशेष म्हणजे आरोपी कुमार कुणाल याचा आधीच सायबर फसवणुकीचा गुन्हेगारी इतिहास असून, त्याच्यावर २०२१ मध्ये सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता, पण तोही न्यायालयाने फेटाळला होता.

 थायलंड पळून जाण्याचा प्रयत्न फसला

तपास अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी ३१ मे रोजी आपल्या पत्नीसह थायलंडला कोलकाता विमानतळावरून जाण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. तात्काळ गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोलकत्ता गाठून विमानतळावर सापळा लावला आणि आरोपीला अटक केली. या अटकेने अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान टळले आहे.

 गुन्हेगारी कलमे व चौकशी

या प्रकरणात आरोपीवर भा.दं.वि कलम ४१९, ४२०, १२०(ब), २०१, ३४ सह आयटी ॲक्ट ४३ (अ)(फ)(ग)(आ), ६६ (सी), ६६ (डी) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक करून ५ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 यशस्वी पथक व मार्गदर्शन

या धडाकेबाज कारवाईचे श्रेय मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे आणि मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाला जाते. अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, आणि पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, दत्ताराम जाधव, संदीप शिर्के, विशाल दळवी, मारुती पारधी, संदेश काकडे यांनी ही अतिशय कौशल्यपूर्ण कारवाई केली आहे.

 शिक्षण संस्थांची प्रतिष्ठा धोक्यात

या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या टोळ्यांचे धाडस स्पष्ट होते. शैक्षणिक संस्थांच्या नावाचा वापर करून केलेली फसवणूक अत्यंत गंभीर असून, यामुळे विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी या प्रकाराला वेळेत आळा घालून मोठी फसवणूक टाळली आहे.