Home Breaking News युनिट ६ गुन्हे शाखेची कारवाई; उत्तरपत्रिकांचे सहा बंडल, २ लाखांहून अधिक रोकड...

युनिट ६ गुन्हे शाखेची कारवाई; उत्तरपत्रिकांचे सहा बंडल, २ लाखांहून अधिक रोकड जप्त; शिक्षण संस्थेच्या नावाला काळिमा

पुण्यात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. वाघोली येथील पार्वतीबाई गेणबा मोझे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी संगनमत करून परीक्षेत मोठा गैरप्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकाने या टोळीवर कारवाई करत प्राध्यापकासह तीन विद्यार्थ्यांना अटक केली असून आठ इतर विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे.

कारवाईचा तपशील:

युनिट ६ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दिनांक २ जून २०२५ रोजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बायफ रोड, वाघोली येथे प्रा. प्रतिक सातव हा इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स-२ या विषयाचा पेपर विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन पुन्हा लिहून घेणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर ३ जून रोजी पोलिसांनी छापा टाकून प्रतिक सातव (३७), आदित्य खिलारे (२०), अमोल नागरगोजे (१९), अनिकेत रोडे (२०) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी ६ उत्तरपत्रिकांचे बंडल, रोख २,०६,००० रुपये आणि परीक्षा नियंत्रण कक्षाची बनावट चावी जप्त केली.

 परीक्षेतील बनावटपणाचे नाट्य:

प्रा. प्रतिक सातव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी परीक्षेत अपयशाची भीती असलेल्या विद्यार्थ्यांकडून १० ते ५० हजार रुपये लाच घेऊन त्यांच्या मूळ उत्तरपत्रिका पुन्हा लिहिण्यासाठी दिल्या. हे कृत्य शासनाच्या परीक्षा यंत्रणेचा विश्वासघात करणारे आणि शिक्षण व्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर गालबोट लावणारे आहे.

 कायदेशीर कारवाई:

या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. २२६/२०२५, भादंवि कलम ३०३(२), ३१८(२)(३)(४), ६१(२) तसेच सार्वजनिक परीक्षा (आयोग साधनांचे प्रतिबंध) विधेयक २०२४ चे कलम ४, ५, १०, ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 तपास करणारे अधिकारी:

ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे १) श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ६ चे प्रभारी निरीक्षक वाहीद पठाण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे आणि त्यांच्या टीमने केली. या पथकात कारखेले, सकटे, तांबेकर, काटे, डोंगरे, व्यवहारे, ताकवणे, धाडगे, मांदळे, पानसरे यांचा समावेश होता.

 शिक्षणक्षेत्राला धक्का:

या घटनेमुळे उच्च शिक्षण क्षेत्रात पारदर्शकतेच्या नावाखाली घडणाऱ्या बेकायदेशीर घडामोडींवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य विकले जात असल्याचे हे प्रकरण दाखवते. पोलिसांकडून या प्रकाराचा अधिक सखोल तपास केला जात असून आणखी आरोपी समोर येण्याची शक्यता आहे.