Home Breaking News मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता ५ जूनपासून खात्यात जमा...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता ५ जूनपासून खात्यात जमा होणार! आदिती तटकरेंकडून महिलांना दिलासा

178
0

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यावर जमा झालेला नसल्याने अनेक महिलांमध्ये चिंता आणि नाराजीचे वातावरण होते. मात्र, या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती देत महिलांच्या मनातील संभ्रम दूर केला आहे.

आदिती तटकरे यांनी ट्विटरवरून माहिती देताना सांगितले की, “मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्याची तांत्रिक प्रक्रिया ४ जूनपासून सुरु करण्यात आली असून, उद्यापासून म्हणजेच ५ जूनपासून ही रक्कम सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात जमा होणार आहे.” त्यांच्या या घोषणेमुळे लाखो महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.

विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी नियमितपणे हप्ता जमा करणाऱ्या सरकारकडून निवडणूक झाल्यानंतर काहीशी दिरंगाई झाली होती. त्यामुळे महिलांमध्ये अस्वस्थता आणि प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, आता पुन्हा नियमिततेकडे वाटचाल होत असल्याचं तटकरे यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.

तटकरे म्हणाल्या की, “महायुती सरकारचा दृढ निश्चय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन या योजनेला बळकटी देत आहेत. राज्यातील लाडक्या बहिणींचा विश्वास हीच आमची प्रेरणा आहे.”

दरमहा १५०० रुपये मिळणाऱ्या या योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. एप्रिल महिन्याचा हप्ता ७ मे रोजी जमा झाला होता, त्यामुळे मे महिन्याच्या रकमेबाबत प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, आता हा मुद्दा मार्गी लागल्यामुळे महिलांनी सरकारचे आभार मानायला सुरुवात केली आहे.

योजना सुरु झाल्यापासून एकूण ११ हप्ते वितरित झाले असून, या दरम्यान १६,५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. काही वेळा दोन महिन्यांचे हप्ते एकत्र जमा केल्यामुळे महिला वर्गाला थोडा दिलासा मिळाला आहे.

महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाची योजना ठरत असलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेची पुढील वाटचालही अशीच सुरु राहील, असा विश्वास मंत्री तटकरे यांनी व्यक्त केला आहे.