पुणे | पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक ठोस आणि कलात्मक पाऊल उचलत, “सीडबॉल” हा मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. जंगलतोड, हवामान बदल आणि जैवविविधतेच्या ऱ्हासासारख्या गंभीर समस्या अधोरेखित करणारा आणि लहान मुलांच्या संघर्षाच्या माध्यमातून निसर्ग वाचवण्याचा संदेश देणारा हा चित्रपट, कोकणातील कुंभारखाणी बुद्रुक या निसर्गरम्य गावात चित्रित करण्यात आला.
“सीडबॉल” हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नाही, तर तो एक पर्यावरण चळवळ बनवण्याचा प्रयत्न आहे. झाडे लावा, झाडे वाचवा, बीज पेरा, जीवन उगवा – हे ब्रीद घेऊन हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. या सिनेमामध्ये १० लाख झाडांची लागवड आणि १ कोटी बीजबॉल टॉसिंगसारखे भव्य उपक्रम दाखवण्यात आले आहेत, जे समाजाला प्रत्यक्ष कृतीसाठी प्रेरणा देतात.
चित्रपटात कमलेश सावंत, अवनी चव्हाण, सोनिया संजय, रुद्र पुणवत, चित्रा देशमुख, कल्याणी नाईक आणि विकास थोरात यांच्या मुख्य भूमिका असून, सलोनी बाळगुडे, अथर्व सुर्वे, ऋग्वेद सुतार, विघ्नेश डांगे या बालकलाकारांनी आपल्या सहज अभिनयाने कहाणीला जिवंतपणा दिला आहे. या चित्रपटातील पात्रं निसर्गप्रेम, संघर्ष, आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर मिलाफ दाखवतात.
चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अखिल देसाई यांनी केल्याने हे प्रकल्प एकाच व्यक्तीच्या दृढ इच्छाशक्तीचा साक्षात्कार आहे. अजित सिंग यांनी सिनेमाचे छायांकन केले असून, अॅलन केपी यांचे संगीत प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवते. नृत्यदिग्दर्शन सुदामा, कला प्रमोद, वेशभूषा गौरी गावंकर यांचेही योगदान लक्षणीय आहे. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ऋत्वी पगार, प्रमोद आणि कोमल यांनी परिश्रम घेतले आहेत. सहनिर्माते ज्योती बडेकर आणि अनिल देवळेकर यांनी या चळवळीस आर्थिक आणि वैचारिक पाठबळ दिले आहे.
“सीडबॉल” ही कहाणी एका गावाच्या देवराईसाठी लढणाऱ्या मुलांची आहे. ही फक्त कथा नाही, तर एक आंदोलन आहे – हरित भविष्यासाठी बीज पेरण्याचे. आजची पिढी निसर्गाच्या वाचवणुकीसाठी पुढे सरसावते आहे, हे या चित्रपटाच्या माध्यमातून स्पष्ट होते.
हा चित्रपट महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात पर्यावरणप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. शाळा, महाविद्यालये, आणि पर्यावरण संघटनांनी हा चित्रपट जरूर पाहावा, कारण तो केवळ दृश्य मनोरंजन नाही, तर तो पर्यावरण रक्षणाची शपथ देणारा दृष्यगाथा आहे.