Home Breaking News “वृक्षथॉन मॅरेथॉन”ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! १० हजार धावपटूंचा पर्यावरण संवर्धनासाठी हिरवा शपथविधी

“वृक्षथॉन मॅरेथॉन”ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! १० हजार धावपटूंचा पर्यावरण संवर्धनासाठी हिरवा शपथविधी

131
0

पुणे : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे शहर पोलिस, वन विभाग पुणे आणि वृक्षथॉन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “वृक्षथॉन मॅरेथॉन”ला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. तब्बल १०,००० नागरिकांनी धाव घेत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. आरोग्य, झाडांची लागवड आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्री उद्दिष्टांसाठी ही मॅरेथॉन एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.

या भव्य मॅरेथॉनचे आयोजन दिनांक १ जून २०२५ रोजी पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर येथून करण्यात आले. स्पर्धेमध्ये २१ कि.मी., १० कि.मी., ५ कि.मी. आणि ३ कि.मी. असे चार टप्पे होते. पहाटे ५ वाजता २१ कि.मी.च्या मॅरेथॉनने प्रारंभ झाला आणि नंतर इतर मॅरेथॉनही टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या.

धावपटूंना हिरवा झेंडा दाखवत मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हा वनसंरक्षक महादेव मोहिते, तसेच चितळे ग्रुपचे इंद्रनील चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मॅरेथॉनची सुरुवात झाली. विद्यापीठ चौक, पाषाण, बावधन मार्गावरून जाताना धावपटूंनी ‘वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा’चा नारा दिला.

या मॅरेथॉनचे खास आकर्षण म्हणजे सहभागी प्रत्येक धावपटूला मेडल, प्रमाणपत्र आणि देशी झाडांचे रोपटे भेट म्हणून देण्यात आले. हा एक अभिनव उपक्रम होता, ज्यातून लोकांनी झाडे लावण्याचे आणि त्यांचे संगोपन करण्याचे वचन घेतले. या मॅरेथॉनने केवळ धावण्याचे नव्हे, तर झाडांचे आयुष्यभर संगोपन करण्याचे बळ दिले.

राज्य शासनाच्या दोन प्रमुख विभाग – पोलिस आणि वन विभाग – यांनी एकत्र येऊन आयोजित केलेली ही पहिलीच मॅरेथॉन होती. चितळे बंधू, बजाज, क्रेडाई, एमक्योर, अॅक्सिस बँक, संचेती हॉस्पिटल, आदर पूनावाला संस्था, फर्ग्युसन आणि मॉडर्न कॉलेज अशा विविध संस्थांनी सहकार्य करत मोठा सहभाग नोंदवला.

धावपटूंमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना EV कार, EV दुचाकी, EV सायकलसह रोख पारितोषिके देण्यात आली. बक्षीस वितरण समारंभ मा. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते पार पडला.

ही मॅरेथॉन केवळ स्पर्धा नव्हती, तर एक सामाजिक चळवळ होती — हरित पुण्याच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल!