Home Breaking News बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शंकर साळुंखे यांचा सेवानिवृत्ती समारंभ...

बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शंकर साळुंखे यांचा सेवानिवृत्ती समारंभ थाटात पार पडला; पोलिस दलाच्या कार्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव

दि. ३१ मे २०२५ रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे यांचा सेवानिवृत्ती समारंभ अत्यंत भरगच्च आणि सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला. पोलीस दलात दीर्घ सेवा बजावणारे आणि आपल्या कर्तव्यनिष्ठेने नावलौकिक मिळवलेले श्री. साळुंखे हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या सेवानिवृत्तीचा समारंभ पोलीस आयुक्त परिमंडळ ५ कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.

या विशेष प्रसंगी परिमंडळ ५ मधील सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, ९ पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच परिमंडळ कार्यालयातील सर्व अधिकारी, अंमलदार, डीओ (ड्युटी ऑफिसर), एटीएस (अँटी टेररिझम स्क्वॉड) व गोपनीय विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला एक वेगळेच भारदस्त आणि भावनिक स्वरूप प्राप्त झाले.

श्री. शंकर साळुंखे यांच्या नोकरीच्या कालावधीत त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल केली, कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी बिबवेवाडी परिसरातील जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला होता. त्यांच्या कार्यशैलीबद्दल सहकारी अधिकारी व अंमलदारांनी गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमात त्यांच्या पत्नी व मुलगा यांना मंचावर आमंत्रित करून पोलिस दलाकडून विशेष आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या सहकार्यामुळेच श्री. साळुंखे यांना निष्ठेने सेवा देता आली, असे नमूद करत उपस्थितांनी त्यांच्या कुटुंबीयांनाही भरभरून शुभेच्छा दिल्या.

सहायक पोलीस आयुक्त वानवडी यांनी आपल्या मनोगतात साळुंखे यांच्या संयमित, समर्पित आणि कर्तव्यदक्ष सेवेस गौरवपूर्वक उल्लेख केला. तसेच, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि गोपनीय विभागाचे अधिकारी यांनी देखील साळुंखे यांच्या कार्यपद्धतीबद्दल आपली मते व्यक्त केली.

कार्यक्रमाची सांगता चहापानाने झाली. उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात साळुंखे यांच्याबद्दलचा सन्मान, प्रेम आणि आपुलकी ओसंडून वाहत होती. हा सोहळा म्हणजे एका आदर्श पोलीस अधिकाऱ्याच्या सेवेला दिलेला समाज आणि सहकाऱ्यांचा सन्मान होता.