बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ३० मे २०२५ रोजी सायं. ४.३० ते ५.३० दरम्यान परिमंडळ ५ कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत परिमंडळ ५ मधील सर्व मस्जिदचे मौलाना, ट्रस्टी, कुरेशी समाजाचे प्रतिनिधी, पुणे मनपा व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी, कत्तलखान्याचे मुकादम तसेच स्थानिक पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीचे आयोजन आगामी बकरी ईद सणाचे शांततेत आणि सुव्यवस्थीत आयोजन करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. सणाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अडचणी, नागरिकांच्या मागण्या आणि सुरक्षिततेसंदर्भातील उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर चर्चा झाली:
-
मस्जिदवरील भोंग्यांचा वापर,
-
कुर्बानीसाठी वापरले जाणारे प्राणी,
-
प्राण्यांची अवैध वाहतूक थांबवणे,
-
बकरा बाजाराची व्यवस्था आणि सुरक्षेचे उपाय,
-
अवैध कत्तलखान्यांवर कारवाई,
-
वाहतूक कोंडी आणि मार्गदर्शन व्यवस्था,
-
स्थानिक नागरिकांची आणि धर्मगुरूंची भावना लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेचा संयमाने वागणूक.
बैठकीत मौलाना, ट्रस्टी आणि कुरेशी समाजाच्या सदस्यांनी आपली मते मांडली व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे, पोलीस विभागाकडून सण काळात कायदा व सुव्यवस्थेसाठी काही नियमावली आणि मार्गदर्शक सूचना सांगण्यात आल्या.
या बैठकीस हडपसर आणि वानवडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त, परिमंडळातील ९ पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे मनपा आणि कॅन्टोन्मेंटचे अधिकारी, तसेच विविध मस्जिदचे मौलाना, ट्रस्टी, कुरेशी समाजाचे प्रमुख, अशा एकूण ७० ते ८० लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.







