Home Breaking News मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेला लुटणारा दुचाकीस्वार १२ तासांत गजाआड! पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे...

मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेला लुटणारा दुचाकीस्वार १२ तासांत गजाआड! पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे गुन्हेगार सापडला

137
0

धनकवडी परिसरात मॉर्निंग वॉक करत असलेल्या एका महिलेला लुटून पसार झालेल्या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक करत मोठं यश मिळवलं आहे. या घटनेने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी केलेल्या जलद आणि अचूक तपासामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

दि. १६ मे २०२५ रोजी सकाळी सुमारे सातच्या सुमारास फिर्यादी महिला सिध्दीविनायक मंदिराजवळील हिलटॉप सोसायटीच्या सार्वजनिक रस्त्यावर मॉर्निंग वॉक करत असताना, एक अनोळखी इसम दुचाकीवरून येत गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून फरार झाला. या प्रकारामुळे महिला आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या प्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु. र. क्र. १९०/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०४ आणि ३०९(६) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गौड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करण्यात आला.

तपासामध्ये तब्बल १५० सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या माध्यमातून पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी स्विगी डिलिव्हरी बॉयच्या वेषात फिरत आहे. पोलिस अंमलदार सागर सुतकर आणि योगेश ढोले यांना बातमी मिळाली की गणेश चौक, आंबेगाव पठार येथे आरोपी दिसून आला आहे. तत्काळ पथक घटनास्थळी रवाना झाले आणि संशयित आरोपीला काही अंतर धाव घेत त्याठिकाणी अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमोल किसन नाकते (वय २७) असून तो पुण्यातील आंबेगाव पठार येथे वास्तव्यास आहे. मूळचा तो वेल्हा तालुक्यातील पिंपरी गावचा आहे.

पोलिस तपासात आरोपीकडून २ तोळे सोनं (किंमत ₹९०,०००/-), गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (किंमत ₹६०,०००/-) आणि चोरलेल्या सोन्याच्या गहाण ठेवून मिळवलेली रक्कम ₹१,००,०००/- असा एकूण ₹२,५०,०००/- चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सदर आरोपीला मा. न्यायालयाने २० मे २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, तपास सहकारनगर पोलीस स्टेशनचे सपोनि सागर पाटील करीत आहेत.

ही संपूर्ण कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुरेखा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पो. फौजदार बापु खुटवड व त्यांच्या पथकातील सागर सुतकर, योगेश ढोले, प्रदीप रेणुसे, महेश भगत, बजरंग पवार, आकाश किर्तीकर, खंडू शिंदे, अमित पदमाळे आणि मारोती नलवाड यांनी केली आहे.