पुणे शहरात दिवसाढवळ्या आणि रात्री पादचाऱ्यांना लुटणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा लष्कर पोलिसांनी पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, या टोळीचा प्रमुख अनिकेत आरणे व त्याचा साथीदार आयान पठाण यांच्यासह एका विधीसंघर्षित बालकाचा समावेश असल्याचे उघड झाले आहे.
दिनांक १५ मे २०२५ रोजी फिर्यादी हे साचापीर स्ट्रीट, कॅम्प परिसरातील सिटीझन ट्रेडिंग बँकेजवळून चालत जात असताना, दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना ढकलून त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९०/२०२५ अन्वये भा.दं.वि. कलम ३०९(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे व शेखर मोकाटे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हा गुन्हा भवानी पेठ परिसरातील अनिकेत आरणे आणि आयान पठाण या दोघांनी केला आहे. पोलिसांनी तत्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली आणि आरोपींचा माग काढत भवानी पेठ मटण मार्केट परिसरात छापा टाकला. तेव्हा पोलिसांनी ट्रिपल सीट, नंबर नसलेल्या होंडा अॅक्टिव्हावरून जात असलेल्या आरोपींना ताब्यात घेतले.
पोलिसी चौकशीत आरोपींनी आपली नावे आयान फिरदोस पठाण (१८ वर्षे) आणि अनिकेत दामु आरणे (२० वर्षे) अशी सांगितली असून, त्यांच्या सोबत एक विधीसंघर्षित बालक देखील चोरीच्या घटनांमध्ये सामील असल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली अॅक्टिव्हा दुचाकी जप्त केली आहे.
पोलिस तपासात असेही समोर आले आहे की, ही टोळी लष्कर व खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा अनेक घटनांमध्ये सक्रिय होती. रस्त्यावरून मोबाईल वापरत चालणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून, त्यांना गाठून लुटमार करणे, हा या टोळीचा मुख्य व्यवसाय होता.
ही कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ २) श्रीमती स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त दीपक निकम यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीष दिघावकर, पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, पो.उप.नि. राहुल घाडगे, पो.उप.नि. शेखर मोकाटे यांच्यासह अंमलदार महेश कदम, अतुल मेंगे, संदीप उकिरडे, सोमनाथ बनसोडे, सचिन मांजरे, रमेश चौधर, सागर हराळ, लोकेश कदम, अमोल कोडिलकर यांनी सहभाग घेतला.
या कारवाईमुळे भवानी पेठ, कॅम्प, खडक परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. नागरिकांनी रस्त्यावर मोबाईल वापरताना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.