पुणे शहरात दिवसेंदिवस मोबाईल चोरी आणि दुचाकी चोरीच्या घटना वाढताना दिसत असताना, खडकी पोलीस ठाण्याच्या दक्ष आणि धडाकेबाज पथकाने मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. वाकडेवाडी परिसरात जुने कामगार आयुक्त कार्यालयाजवळ झालेल्या जबरी चोरी प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून एकूण ₹८.५० लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, ज्यामध्ये २२ मोबाईल फोन, टॅब आणि ६ मोटारसायकलींचा समावेश आहे.
ही कारवाई दि. ६ मे २०२५ रोजी झाली. तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, तसेच पोलीस अंमलदार गालीब मुल्ला आणि सुधाकर राठोड यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जुनी कामगार आयुक्त कार्यालयात झालेल्या जबरी चोरी प्रकरणातील आरोपी वाकडेवाडी बस स्टँड परिसरात आले आहेत. माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तातडीने छापा टाकण्यात आला.
या कारवाईत आश्पाक आयुब शेख (वय २३, रा. आदर्शनगर, भाऊ पाटील रोड, बोपोडी) आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक (नाव गोपनीय) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी केवळ खडकीच नव्हे तर येरवडा, स्वारगेट, शिवाजीनगर, हडपसर, वारजे, कोथरूड यासारख्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोबाईल स्नॅचिंग व दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले.
या गुन्ह्यांसंदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात गु. र. नंबर ८४४/२०२४, भा.दं.वि. कलम ३९२ अन्वये आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या तपासात पोलिसांनी विविध ठिकाणी जाऊन मुद्देमाल हस्तगत केला असून नागरिकांचे मौल्यवान मोबाईल व वाहने परत मिळवून दिली आहेत. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) श्री. मनोजकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ४) श्री. हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त (खडकी विभाग) श्री. विठल दबडे, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी पोलीस स्टेशन श्री. दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या तपास पथकात पो.उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, पोलीस अंमलदार आश्विनी कांबळे, अशिष पवार, संदेश निकाळजे, अनिकेत भोसले, प्रताप केदारी, सुधाकर तागड, ऋषिकेश दिघे, दिनेश भोये, शिवराजखेड, अनिल पुंडलीक, आणि प्रविण गव्हाणे यांचा समावेश होता.
🔹 नागरिकांसाठी सूचना सार्वजनिक ठिकाणी मोबाईल वापरताना सतर्क रहा. अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधा.