Home Breaking News मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपीकडून मोठा छडा; १.९० लाखांचे मोबाईल व दुचाकी पोलिसांनी केली...

मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपीकडून मोठा छडा; १.९० लाखांचे मोबाईल व दुचाकी पोलिसांनी केली जप्त

पुणे | भारती विद्यापीठ पोलीसांची कारवाई, नागरिकांमध्ये दिलासा

पुणे शहरात मोबाईल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या दक्षतेमुळे एक महत्त्वाचा गुन्हा उघडकीस आला आहे. दिनांक ०१ मे २०२५ रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गुजरवाडी फाटा, महेश कदम यांच्या बंगल्याजवळील गोल्डन स्क्रॅप सेंटरसमोर एक धक्कादायक घटना घडली. फिर्यादी व्यक्ती फोनवर बोलत असताना दोन दुचाकीस्वार अज्ञात इसमांनी त्यांच्या हातातील मोबाईल फोन हिसकावून पलायन केले.

या घटनेनंतर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड विधान कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना कात्रज परिसरात राहणाऱ्या रोहित सुरेश कांबळे (वय १८ वर्षे ६ महिने) आणि सलमान शेख या दोघांवर संशय गेला. पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर भारतनगर परिसरातून रोहित कांबळे यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून ₹९०,०००/- किंमतीचे ६ मोबाईल फोन आणि ₹१,००,०००/- किंमतीची ज्युपिटर दुचाकी पोलिसांनी जप्त केली. आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्याच्याकडून मिळालेल्या मोबाईल्स व दुचाकीबाबत पुढील तपास सुरु आहे.

या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठा दिलासा मिळाला असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदरची यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) श्री. प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राहुल आवारे, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तपास पथकात पो.उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पो.अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, व संदीप आगळे यांनी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली.

🔹 पोलिसांकडून नागरिकांना आवाहन 🔹
मोबाईल वापरताना सार्वजनिक ठिकाणी सतर्क राहा. संशयित हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवा.