मुंबई :- राज्याच्या गडचिरोली जिल्ह्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. कारण गोंडवाना विद्यापीठ, लॉईड स्टील कंपनी आणि पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठित कर्टीन विद्यापीठ यांच्यात आज मुंबईतील राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्वाचा सामंजस्य करार (MoU) झाला. या करारामुळे गडचिरोलीच्या शैक्षणिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला अभूतपूर्व गती मिळणार आहे.
राज्यपाल राधाकृष्णन यांनी या वेळी सांगितले की, “गोंडवाना विद्यापीठाने केलेल्या या करारामुळे गडचिरोलीचा चेहरामोहरा बदलणार आहे. हे जिल्हा लवकरच राज्यातील सर्वाधिक समृद्ध आणि औद्योगिकदृष्ट्या सक्षम जिल्हा बनेल.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले की, गडचिरोली ‘स्टील हब’ म्हणून उदयास येईल, आणि पुढील पाच वर्षांत हा भाग भारतातील स्टील निर्मितीचा मोठा केंद्रबिंदू बनेल. लॉईड स्टील व एनर्जी कंपनीच्या सहकार्याने स्थानिक स्तरावर विद्यार्थ्यांना धातुशास्त्र, खाणकाम, संगणक विज्ञान आदी शाखांमध्ये दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण मिळणार आहे. या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
कर्टीन विद्यापीठासोबतच्या करारामुळे विद्यार्थ्यांना ट्विनिंग डिग्री (उभयपक्षी पदवी) प्राप्त होईल. यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी आता गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची गरज भासणार नाही. ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था’ ही स्वायत्त संस्था खाण, धातू, संगणक, डेटा सायन्स यासारख्या अत्याधुनिक विषयांमध्ये कौशल्य प्रशिक्षण देईल.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे राज्यात आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, नवी मुंबई एज्युसीटी या प्रकल्पामुळे राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती होणार आहे.”
या सोहळ्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार डॉ. परिणय फुके, कर्टीन विद्यापीठाचे मार्क ऑग्डन, लॉईड स्टीलचे एमडी बी. प्रभाकरन आणि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या करारामुळे गडचिरोली जिल्हा शैक्षणिक आणि औद्योगिकदृष्ट्या स्वतंत्र उभारणीकडे वाटचाल करणार आहे. या माध्यमातून ना केवळ स्थानिक रोजगारनिर्मिती होणार आहे, तर गडचिरोली राज्यातील सर्वात प्रगत जिल्हा म्हणून नावारूपाला येणार आहे.
मुख्य ठळक मुद्दे :
-
गोंडवाना विद्यापीठ + लॉईड स्टील + कर्टीन विद्यापीठ यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
-
स्थानिक विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी व कौशल्य शिक्षणाची नवी दारे उघडणार
-
गडचिरोली स्टील आणि खनिज क्षेत्रात आघाडीवर येणार
-
गडचिरोलीतील विकास आणि नक्षलवादाचा अंमलबजावणीसाठी पायाभूत निर्णय
-
शिक्षण, रोजगार, उद्योग आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचा संगम






