Home Breaking News पाकिस्तान बिथरलं! एअर स्ट्राईकनंतर सीमेवर मध्यरात्री अंदाधुंद गोळीबार; भारताने दिलं चोख प्रत्युत्तर

पाकिस्तान बिथरलं! एअर स्ट्राईकनंतर सीमेवर मध्यरात्री अंदाधुंद गोळीबार; भारताने दिलं चोख प्रत्युत्तर

भारताने नुकत्याच केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. देशाच्या संरक्षणासाठी भारतीय लष्कराने उचललेले हे पाऊल निर्णायक ठरले असून, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.

या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमारेषेवर सतत आगळिक केली जात आहे. बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील करनाह सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने अचानकपणे अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर (LOC) स्थित गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. स्थानिक प्रशासनाने तातडीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं.

गोळीबारामुळे अनेक घरांना आणि इमारतींना नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यामध्ये काही नागरिक जखमी झाल्याचीही शक्यता असून, अद्याप कोणत्याही जीवितहानीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, गोळीबाराच्या या भ्याड कृत्यात भारताचे वीरपुत्र लान्स नाईक दिनेश कुमार (५ वी फील्ड रेजिमेंट) शहीद झाले. व्हाईट नाईट कॉर्प्सने त्यांच्या शौर्याचा गौरव करत अधिकृतपणे ही माहिती दिली आहे.

भारताकडूनही पाकच्या या आगळिकीला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भारतीय लष्कराने सीमारेषेवर तात्काळ कारवाई करत पाकिस्तानच्या सैन्याला कडक प्रत्युत्तर दिलं. हे प्रत्युत्तर इतकं प्रबळ होतं की, पाकिस्तानच्या सैन्यात क्षणिक गोंधळाचे वातावरण निर्माण झालं.

या पार्श्वभूमीवर आता भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर सतत सुरु असलेल्या या चकमकींमुळे सैन्य आणि स्थानिक नागरिक दोघांच्याही जीवाला धोका पोहचत आहे.

लान्स नाईक दिनेश कुमार यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांप्रती देशवासियांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांचे शौर्य हे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायक ठरणार आहे.